
शिवसेना आणि कोकण यांचे नाते अभेद्य आहे. कोकणी जनता आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यामध्ये कोणी कितीही प्रकारे फारकत करण्याचा प्रयत्न केला तरी शिवसेना आणि कोकणी जनतेत थोडीही फारकत होणार नाही. ते आपुलकीच्या जवळीकतेच्या घट्ट विणीचे नाते आहे. ज्यांनी शिवसेनेच्या नावावर कमावले त्यांनी शिवसेनेशी गद्दारी करत मातोश्रीच्या पाठीत खंजीर खुपसला. मातोश्रीच्या पाठींत खंजीर खुपसलेल्यांना कोकणी जनता कधीच माफ करणार नाही. निवडणुक येऊ दे. निवडणुकीत कोणाचा निकाल लागेल ते मातोश्रीशी गद्दारी केलेल्यांना तेव्हा पुरते समजून चुकेल, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अनंत गिते यांनी वाकवली येथे ठणकावून सांगितले.
दापोलीचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाकवली येथे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिवसेना शाखेच्या नाम फलकाच्या अनावरणाचा कार्यक्रम शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत अनंत गिते यांच्याहस्ते मोठया दणक्यात पार पडला. यावेळी अनंत गिते म्हणाले की, दापोली येथील शिवसेना संपली आहे, असे खोडसाळ वृत्त पसरवणाऱ्यांना वाकवलीतील कार्यक्रमाने चांगलीच चपराक बसली आहे. दापोली तालूका म्हणजे नररत्नांची खाण… या भुमीत गद्दारीला स्थान नाही. या भुमीतील जनता आजही शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम उभी आहे. त्यामुळे दापोलीला गद्दारीचा डाग लागू देणार नाही. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे पुन्हा महाराष्ट्र राज्याचे सन्मानाने मुख्यमंत्री होतील आणि त्यावेळी दापोली विधानसभा मतदार संघाचा संजय कदम यांच्या रूपाने भगवा शिलेदार हा विधासभेच्या सदनात असेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्रातही इंडिया आघाडीचे सरकार येईल, असेही ते म्हणाले.