
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी संविधान बदलण्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून आज यू टर्न घेतला. वरिष्ठांच्या आदेशानुसार आज त्यांनी वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आणि त्यांच्या राज्यघटनेबाबत आपल्याला आदर आहे. तसेच संविधानावर आपला विश्वास आहे, असे हेगडे म्हणाले.
राज्यघटना बदलण्यासाठीच आम्ही सत्तेत आलो आहोत. सेक्युलर शब्द घटनेतून काढल्याशिवाय राहणार नाही, असे वादग्रस्त विधान करून भाजपसह सरकारला अडचणीत आणणारे केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी आज सुंभ जळला तरी पीळ कायम या वृत्तीचे दर्शन घडविले. हेगडेंच्या वादग्रस्त विधानामुळे देशभर गदारोळ उडालेला असताना तसेच संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज ठप्प पडलेले असताना आजही संसदेत या मुद्द्य़ावरून गदारोळ होण्याची चिन्हे होती. त्यामुळे सरकारच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार अनंतकुमार हेगडे यांनी, मी राज्यघटना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि देशाशी एकनिष्ठ आहे. राज्यघटनेचा अवमान करण्याची मी कल्पनाही करू शकत नाही.
मी सगळ्य़ांचा सन्मान करतो असे त्रोटक निवेदन करून हेगडे खाली बसले खरे; मात्र काँग्रेसने हेगडेंच्या या हेकेखोर वृत्तीचा निषेध करत माफी मागा अशी मागणी केली. त्यावेळी हस्तक्षेप करताना लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी, कोणी माफी मागितली म्हणून काही लहान होत नाही असे सांगत त्यांनी हेगडेंचे कानच उपटले. त्यानंतर माझ्या विधानामुळे कोणी दुखावले असण्याची शक्यता आहे. माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला त्याबद्दल दिलगीर आहे असे म्हणत हेगडेंनी नाइलाजाने दिलगिरी व्यक्त केली व त्यानंतर संसदेतील वादावर पडदा पडला.
























































