प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू; मदतकार्य युद्धपातळीवर सुरू

482

पूर्व गोदावरी जिल्ह्यात पर्यटकांनी भरलेल्या एका बसचा भीषण अपघात झाला आहे. बस दरीत कोसळून झालेल्या अपघातामध्ये आठ प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मतदकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मरेदुमिल्ली आणि चिंतरूदरम्यान हा अपघात झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशमधील मरेदुमिल्लीपासून 40 किलोमीटर अंतरावर छत्तीसगड सीमेवर असणाऱ्या राजमुंदरी या आदिवासी भागातून पर्यटक चिंतरूकडे जात होते. घाटम रोडवर दुपारी दोन वाजता वाल्मिमी कोंडा येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस खोल दरीमध्ये कोसळली. ही दुर्घटना घडली तेव्हा चालक-वाहकासह 20 ते 25 प्रवाशी बसमधून प्रवास करत होते.

खोल दरीमध्ये कोसळल्याने बसचा चुराडा झाला. या दुर्देवी अपघातात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघांनी रुग्णालयात दम तोडला. बसमधील अनेक प्रवाशी गंभीर जखमी आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून यातील काहींची प्रकृती गंभीर आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दुर्घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, बसचा वेग प्रमाणापेक्षा जास्त होता. यामुळे चालकाचे स्टेअरिंगवरून नियंत्रण सुटल्याने किंवा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला असावा अशी शक्यता आहे. स्थानिकांनी देखील मरेदुमिल्ली आणि चिंतरूदरम्यानचा रस्ता नुकत्याच झालेल्या पावसामुळे घसरडा झाला होता. तसेच पावसामुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे हा अपघात झाला असावा अशी शक्यता व्यक्त केली आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून जंगलाचा भाग असल्याने बचावकार्यात अडथळा येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या