चोरी करण्यासाठी घरात घुसला….अन् गाढ झोपून गेला…वाचा नेमके काय झाले ते…

चोरी करताना एखादी लहान चूक चोरांना महागात पडते. आपल्याला पोलीस पकडूच शकत नाही, असे चोर समजत असतो. मात्र, पोलीस सूतावरून स्वर्ग गाठत चोरांचा माग काढतात. मात्र, चोरी करताना चोर गाढ झोपून गेला तर…कल्पनाच हास्यास्पद वाटते. पण अशी घटना आंध्र प्रदेशमध्ये घडली आहे. चोरीच्या हेतूने चोर घरात घुसला होता. खोलीतील एसीच्या थंडगार हवेने तो सुखावला आणि त्याने डोळे मिटले. चार पाच तासानंतर त्याचे डोळे उघडले तेव्हा तो तुरुंगात होता.

आंध्र प्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातील गोकवारम गावात राहणाऱ्या 21 वर्षांच्या सूरीबाबूने सत्ती व्यंकट रेड्डी यांच्या घरी चोरी करण्याची योजना आखली. रेड्डी पेट्रोलपंप मालक आहेत. त्यांच्या घरात चोरी केल्यास मोठे घबाड सापडेल, अशी योजना सूरीबाबूने आखली होती. त्यासाठी त्याने रेड्डी यांच्या घराची रेकी केली होती. रेड्डी कोणत्या खोलीत झोपतात, याची माहिती त्याने काढली. त्यानंतर अनेक दिवस रेड्डी यांच्या दिनक्रमावर त्याने लक्ष ठेवले. त्यानंतर चोरीची योजना निश्चित केली. आपली चोरी पकडली जाणार नाही, असा आत्मविश्वास निर्माण झाल्यावर त्याने चोरीचा दिवस ठरवला.

योजनेप्रमाणे ठरलेल्या रात्री सूरीबाबू रेड्डी यांच्या खोलीत पहाटे 4 वाजता चोरीच्या उद्देशाने घुसला. त्यावेळी रेड्डी गाढ झोपल्याचे पाहून आपला हेतू साध्य होईल, असे त्याला वाटले. त्याचवेळी एसीच्या थंडगार हवेचा झोत त्याच्यावर आला. एसीच्या थंड हवेने तो सुखावला. त्यामुळे थोडी विश्रांती घेऊन डल्ला मारण्याचा विचार त्याने केला. त्यामुळे तो रेड्डी यांच्या पलंगाखाली गेला आणि त्याने डोळे मिटले. काही क्षणातच त्याला गाढ झोप लागली आणि तो घोरू लागला. घोरण्याच्या आवाजाने रेड्डी यांना जाग आली. घरात चोर शिरल्याचे आणि तो गाढ झोपल्याचे त्यांना समजतले. त्यांनी खोली बंद केली आणि पोलिसांना बोलावले.

पोलिसांनी गाढ झोपलेल्या सूरीबाबूला ताब्यात घेतले. तेव्हाही तो झोपतच होता. चार-पाच तासानंतर त्याने डोळे उघडले आणि तुरुंगात असल्याचे त्याला समजले. पोलिसांनी त्याची चौकशी केल्यावर ही घटना उघडकीस आली. आपण घराची रेकी केल्यानंतर चोरीची योजना आखली होती. मात्र, दिवसभर कामामुळे थकलो होतो. त्यामुळे एसीची हवा लागल्यावर थोडी विश्रांती घेण्याचा विचार मनात आला. त्यासाठी रेड्डी यांच्या पलंगाखाली गेलो आणि तिथेच मोठी चूक झाल्याने त्याने पोलिसांना सांगितले. सूरीबाबू सराईत चोर नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. तो मिठाईच्या दुकानात काम करत होता. लॉकडाऊनमुळे काम गेल्याने त्याने चोरीची योजना आखली. मात्र, एसीच्या थंडगार झोताने आलेल्या झोपेमुळे तो अलगद पोलिसांच्या ताब्यात सापडला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या