अंगणवाडी सेविकांचे ‘मोबाईल वापसी’ आंदोलन, केंद्राने तक्रारींची दखल घेतली नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पोषण अभियानांतर्गत दोन वर्षांपूर्वी अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाईल फोन परत करण्याचे आंदोलन पुकारले असून राज्यातून लाखभर फोन परत केले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीचे एम. ए. पाटील यांनी दिली.

राज्यात 1 लाख 5 हजार 592 अंगणवाडी सेविका आहेत. त्यांना पोषण अभियानांतर्गत 2019 मध्ये मोबाईल फोन दिले होते. स्तनदा माता, गरोदर महिला व बालकांचे वजन, उंची याची माहिती त्यात भरायची होती. मात्र मोबाईलचे रॅम कमी पडत आहे. ‘ट्रकर ऍप’ यात डाऊनलोड होत नाही. त्यातील माहिती ‘डीलिट’ करता येत नाही. फोनच्या चार्जिंगमध्ये अडचणी असून मोबाईल सतत हँगसुद्धा होतो. त्यामुळे अंगणकाडी सेविकांनी वैयक्तिक मोबाईलमध्ये ट्रॅकर डाऊनलोड करून इतरांच्या मदतीने माहिती भरत आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी आता मोबाईल वापसी चळवळ सुरू केली आहे. पुढच्या आठवडय़ात सुमारे एक लाख मोबाईल प्रकल्प अधिकाऱयाकडे जमा करण्यात येतील, अशी माहिती कृती समितीच्या शुभा शमीम यांनी दिली.

स्मृती इराणींनी दखल घेतली नाही

ऑल इंडिया फेडरेशन ऑफ अंगणवाडी वर्कर असोसिएशनने मोबाईलसदंर्भात केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे तक्रारी केलेल्या आहेत. परंतु केंद्राने दखल न घेतल्याने मोबाईल वापसीचे देशव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे.