राज्यातील तीन हजार अंगणवाड्या होणार स्मार्ट

524

राज्यातील अंगणवाड्यांचे आदर्श अंगणवाडी केंद्रात रुपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील जवळपास तीन हजार 30 अंगणवाडी केंद्रांना स्मार्ट अंगणवाडी किट देण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने 50 कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे या अंगणवाड्यांना लवकरच स्मार्ट अंगणवाडी किट मिळणार आहे.

राज्यातील अंगणवाड्यांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याआधी 2017-18 या आर्थिक वर्षात राज्यातील पाच हजार अंगणवाड्या आणि त्यानंतर प्रत्येक वर्षात टप्प्याटप्प्याने अंगणवाडीचा दर्जा सुधारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आता 2019-20 या वर्षात राज्यातील तीन हजार अंगणवाड्या आदर्श अंगणवाडी केंद्रात रुपांतरीत करण्यात येणार आहेत.

राज्यातील बहुतांश अंगणवाड्यांत अजूनही वीजपुरवठ्याची सोय नाही. ग्रामीण भागातील अंगणवाड्यांत भारनियमनाची समस्या आहे. त्यामुळे या अंगणवाड्यांसाठी सोलर प्रकल्प योजना सुरू करण्याचे नियोजन आहे. अनेक अंगणवाड्यांना इमारती नाहीत. या अडचणी कमी करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या अंगणवाड्यांचा दर्जा सुधारण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. यासाठी आदर्श अंगणवाडी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याआधी अंगणवाड्यांचे कामकाज ऑनलाइन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी अंगणवाडी कर्मचार्‍यांना स्मार्ट फोन देण्यात आले आहेत. या फोनद्वारे ऑनलाइन कामकाजास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे कागदपत्रे सांभाळण्याचा त्रास कमी झाला आहे. त्यानंतर आता अंगणवाड्यांना स्मार्ट किट देण्यात येणार आहे. यासाठी ई टेंडर मंजूर करण्यात येऊन खरेदी प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. यानंतर राज्यातील अंगणवाड्यांना किट पुरवठा करण्यात येणार आहे. या माध्यमातून अंगणवाड्या स्मार्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या