अंगणवाडीच्या ‘लाडक्या बहिणी’ मंत्रालयाच्या दारात! मानधनवाढीसाठी बुधवारी मोर्चा

सध्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा उदो उदो सुरू असला, तरी अनेक वर्षांपासून अगदी तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडीच्या सेविकांना तथाकथित सरकारच्या लाडक्या बहिणींना न्याय कधी मिळेल, याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मानधनवाढीसाठी सरकारविरुद्ध आंदोलनाचे शस्त्र उपसले असून, बुधवारी (दि. 21) मंत्रालयावर मोर्चाचे आयोजन केले आहे.

‘लाडकी बहीण योजने’द्वारा सरकार स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. परंतु अंगणवाडी कर्मचारी बहिणींच्या प्रश्नांकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष करत आहे. अंगणवाडी ताईंचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या सर्वच मागण्यांसाठी आणि मानधनवाढीच्या मागणीसाठी 21 ऑगस्ट रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती अंगणवाडी कर्मचारी सभेच्या महाराष्ट्र अध्यक्षा ऍड. निशा शिवूरकर यांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून संघर्ष करीत आहेत. 15 जुलैपासून कर्मचाऱ्यांनी असहकार आंदोलन अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने सुरू केले आहे. या आंदोलनामुळे अंगणवाडी कर्मचारी यांनी शासकीय मीटिंगा, अहवाल देणे इत्यादी कामांवर बहिष्कार टाकला आहे. 12 ऑगस्टपासून मुंबईला आझाद मैदानावर कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन सुरू आहे. एकीकडे महाराष्ट्र सरकार ‘लाडकी बहीण योजने’द्वारा स्वतःची पाठ थोपटून घेत असले, तरी अंगणवाडी कर्मचारी बहिणींच्या प्रश्नांकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष करीत आहे.

अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या बैठकांमध्ये महिला बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव शासनाला देण्याचे मान्य केले आहे. मग त्यावर काहीच होत नाही, त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहेत. अशा परिस्थितीत अंगणवाडी कर्मचारी बुधवारी (दि. 21) मुंबई येथे आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. नगर जिह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याध्यक्षा ऍड. निशा शिवूरकर, जिल्हाध्यक्ष सत्यभामा तिटमे, शांताराम गोसावी, भारती धरत, बेबी हरनामे, पूजा घाटकर, सुनंदा राहणे, शोभा नागरे, सुनंदा कदम यांनी केले आहे.