
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
अंगारकी संकष्टी निमित्त आज गणपती पुळ्यातील गणेशमंदिरात दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. अंगारकी संकष्टी आणि नाताळची सुट्टी यामुळे गणपती पुळ्याचा समुद्रही पर्यटकांनी फुलला होता.
अंगारकी निमित्त मंगळवार पहाटे साडेतीन वाजल्यापासून गणपतीपुळ्यातील श्री गणेश मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. सुट्टी असल्यामुळे भाविकांची गर्दी होणार हा अंदाज मानून देवस्थान आणि पोलीस दलाने कडेकोट व्यवस्था केली होती. मंदिराच्या आवारात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पहाटेपासूनच मंदिराच्या आवारात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. गणपती बाप्पांचा जयजयकार करत भाविक पुढे रांगेत पुढे सरकत होते. अंगारकी संकष्टी निमित्ताने गणपतीपुळ्यात जत्राही भरली होती. गणपती बाप्पाच्या दर्शनानंतर पर्यटकांचे पाय समुद्रकिनाऱ्याकडे वळले. समुद्रकिनाराही पर्यटकांनी बहरला होता.






























































