अनिल अंबानी यांनी दिला आरकॉमच्या संचालकपदाचा राजीनामा

847

कर्जाच्या चक्रात अडकलेले रिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी यांनी रिलायन्स कम्युनिकेशनच्या (आरकॉम) संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यासह आरकॉमच्या इतर चार अधिकाऱ्यांनीही राजीनामा दिला आहे. ‘बिजनेस टुडे’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. अंबानी यांच्यासह छाया विरानी, रायना कारानी, मंजरी काकेर आणि सुरेश रंगाचर यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे.

अनिल अंबानी, छाया विरानी, मंजरी काकेर यांनी 15 नोव्हेंबरला राजीनामा दिला आहे. तर रायना कारानी यांनी 14 नोव्हेंबर तर सुरेश रंगाचर यांनी 13 नोव्हेंबरला राजीनामा दिला आहे.  आरकॉमची दुसऱ्या तिमाहीतील आकडेवारी शुक्रवारी जाहीर झाली आहे. या तिमाहीत कंपनीला 30,142 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. या कंपनीवर दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 1,141 कोटी रुपयांचा नफा झाला होता. सध्या आरकॉम कर्जाच्या चक्रात अडकली असून कंपनीचे शेअर 59 पैशांपर्यंत घसरले आहेत. अॅडजेस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू ( एजीआर) साठी कंपनीने 28,314 कोटींची तजवीज केल्याचे आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे. एजीआर म्हणजे टेलिकॉम कंपन्यांना दूरसंचार विभागाला  शुल्क भरावे लागते. या शुल्काविरोधात टेलिकॉम कंपन्या सर्वोच्च न्यायालयात गेल्या होत्या. मात्र, न्यायालयाने सरकारची बाजू योग्य असल्याचे म्हटले होते. त्यामुळे कंपन्यांना हे शुल्क भरावे लागणार आहे.

चीनच्या तीन मोठ्या बँकांनी अनिल अंबानी यांच्याविरोधात लंडनच्या न्यायालयात 680 मिलीयन डॉलरच्या ( सुमारे 47,600 कोटी) थकबाकीचा दावा दाखल केला आहे. या तीन बँकांमध्ये इंडस्ट्रियल अॅण्ड कमर्शियल बँक ऑफ चायना लिमिटेड, चायना डेव्हलपमेंट बँक आणि एक्सपोर्ट- इम्पोर्ट बँक यांचा समावेश आहे. अनिल अंबानी यांनी व्यक्तिगत हमी देत 2012 मध्ये आरकॉमसाठी 92.52 कोटी डॉलरचे कर्ज घेतल्याचा दावा या कंपन्यांनी केला आहे. मात्र, फेब्रुवारी 2017 पासून आरकॉमने कर्जाचे हप्ते भरलेले नाहीत. आरकॉम संकटात असल्यानेच अनिल अंबानी यांनी राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या