उद्योगपती अनिल अंबानी यांच्या 1,120 कोटींच्या मालमत्ता जप्त, बँक कर्ज घोटाळा प्रकरणी ईडीची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिलायन्स धीरूभाई अंबानी ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठा दणका दिला आहे. ईडीने अंबानी यांच्याशी संबंधित कंपन्याची 1,120 कोटी रुपये किमतीची मालमत्ता जप्त केली आहे. आतापर्यंत ईडीने अनिल अंबानी यांच्या एकूण 10,117 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत.

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथील रिलायन्स सेंटर यासह बँकांमधील मुदत ठेवी, विविध ठिकाणी केलेली गुंतवणूक आदींसह 18 मालमत्ता जप्त केल्या आहेत. त्याशिवाय रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या सात, रिलायन्स पॉवरच्या दोन आणि रिलायन्स व्हॅल्यू सर्व्हिसेसच्या नऊ मालमत्तादेखील जप्त करण्यात आल्या आहेत. अनिल अंबानी यांच्यावर बॅँक कर्ज घोटाळय़ाप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. यापूर्वी 9 हजार कोटी रुपयांच्या विविध मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या.