अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल, फडणवीसांचे मानले आभार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. यावरून देशमुख यांनी भाजपवर टीका केली असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उपरोधिकपणे आभार मानले आहेत. तसेच फडणवीसांकडून खालच्या पातळीचे राजकारण केले जात आहे असेही देशमुख म्हणाले.

एक्सवर पोस्ट करून देशमुख म्हणाले की धन्यवाद… देवेंद्रजी फडणवीस. माझ्यावर CBI कडून आणखी एक तथ्यहीन गुन्हा दाखल केला गेला आहे. जनतेचा कौल बघून फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्याने हे कटकारस्थान सुरू झाले आहे. या अशा धमक्यांना आणि दबावाला मी अजिबात भीक घालत नाही. न झुकता – न डगमगता मी भाजपच्या या दडपशाही विरुद्ध लढण्याची खूनगाठ बांधली आहे असे देशमुख म्हणाले.

तसेच महाराष्ट्रात फडणवीसांकडून किती खालच्या पातळीचे आणि विकृत मानसिकतेचे घाणेरडे राजकारण सुरू आहे ते जनतेने बघावे. लोकसभा निवडणुकीत या कारस्थानी नेतृत्वाला जनतेने जागा दाखवून दिली आहे, आता महाराष्ट्राची जनता विधानसभा निवडणुकीची वाट बघत आहे, असेही देशमुख म्हणाले.