लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने कापूस व सोयाबीन उत्पादकांना दहा हजार रुपयांची तुटपुंजी मदत जाहीर केली. दुसरीकडे नुकसानभरपाईसाठी ई-पीक पाहणीची जाचक अट सरकारने लावली. परिणामी बहुतांश शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे ई-पीक पाहणीची अट रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मोसंबीच्या नुकसानीची मदत द्या
अनिल देशमुख यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांची विचारपूस केली आणि मोसंबीच्या पिकाचा आढावा घेतला. सध्या सततच्या पावसामुळे विदर्भातील मोसंबीची मोठय़ा प्रमाणात गळ होत आहे. नेमकी कोणत्या कारणामुळे ही गळ होत आहे हे अजून पुढे आले नाही. यामुळे राज्य शासनाने तातडीने यांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, तसेच कृषीविभागातील तज्ञांनी यावर संशोधन करून उपाययोजना सुचवाव्यात, अशी मागणीही अनिल देशमुख यांनी
केली आहे.