
छापा टाकून मला अटक करण्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डाव आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. सीबीआयने गुन्हा केल्याचे प्रकरण चार वर्षांपूर्वीचे असून हे प्रकरण उकरून काढत माझ्याविरुद्ध दिल्लीच्या मदतीने फडणवीस यांनी एफआयआर दाखल केला आहे, असे देशमुख यांनी एक्सवरील पोस्टद्वारे नमूद केले आहे.
चार वर्षांपूर्वी मी गृहमंत्री असताना जळगावच्या एका घटनेमध्ये भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी जळगावच्या पोलीस अधिकाऱयावर दबाव टाकला होता, असा आरोप माझ्यावर करण्यात आला, असेही अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. छापा टाकून मला अटक करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत आहेत. ज्या फडणवीसांनी दिल्लीच्या मदतीने ईडी-सीबीआयला हाताशी धरून महाराष्ट्राचे राजकारण खालच्या स्तरावर आणले त्यांना सांगू इच्छितो की, फडणवीस मी माझ्या अटकेची वाट पाहत आहे, असे आव्हान देशमुख यांनी एक्स पोस्टद्वारे दिले आहे.


























































