कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी त्रिसूत्रीचा अवलंब करा – ॲड.अनिल परब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने प्रशासनाने योग्य नियोजन सुरू केले आहे. कोविडची तिसरी लाट थोपवायची असेल तर मास्क, सोशल डिस्टिन्सिंग आणि हात स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा, असे आवाहन रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.अनिल परब यांनी केले. ते रविवारी 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात बोलत होते. कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी आवश्यक आरोग्य यंत्रणा उभी करण्यासोबत 82 मेट्रिक टन ऑक्सिजनची उपलब्धता होणार आहे. जिल्हा नियोजन मधून 30 टक्के निधीची तरतूद कोविड उपाययोजना आणि आरोग्य यंत्रणेसाठी करण्यात आली आहे. 75 कोटी रूपयांच्या निधीपैकी 38 कोटी रूपये निधीला मंजूरी देण्यात आली आहे., अशी माहितीही परब यांनी दिली.

पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री ॲड.अनिल परब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संचलन करण्यात आले. त्यानंतर चिपळूण येथील पूरग्रस्तांसाठी बचाव कार्य केलेल्या स्वयंसेवी संस्थांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच कोविडयोद्ध्यांचा गौरव करण्यात आला. पालकमंत्री ॲड.परब यांनी सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. पुढे ते म्हणाले की, गेल्या काही दिवसात जिल्ह्यावर अनेक नैसर्गिक संकटे आली. निसर्ग चक्रीवादळ, तौक्ते चक्रीवादळ, पूर,अतिवृष्टी झाली. त्या संकटातून आपण सावरत आहोत. महापूरानंतर चिपळूणात रोगराई पसरू नये म्हणून आरोग्य यंत्रणेने मेहनत घेतली. या संकटातील मृतांच्या वारसांना शासनाकडून 1 कोटी 31 लाख रूपयांची मदत देण्यात आली. नुकसानग्रस्तांना एसडीआरएफ आणि राज्य सरकारकडून प्रत्येकी 5-5 हजार रूपयांची मदत देण्यात आली आहे. शेतीचेही नुकसान झाले आहे, त्यांनाही मदत देण्यात येत असल्याचे ॲड.परब यांनी सांगितले.

कोविडच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. प्रशासनाने आवश्यक बेड, ऑक्सिजनची तयारी ठेवली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जि.प.अध्यक्ष विक्रांत जाधव, जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.इंदूराणी जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग, नगराध्यक्ष प्रदीप साळवी उपस्थित होते.