गरज पडल्यास जिल्हा वार्षिक योजनेतून निधी खर्च करा- पालकमंत्री ॲड.अनिल परब

607

aकोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी आवश्यक असणारी वैद्यकीय यंत्रसामुग्री, साहित्य, औषध खरेदी करण्यासाठी तसेच सार्वजनिक ठिकाणे निर्जंतुक करण्यासाठी गरज पडल्यास जिल्हा वार्षिक योजनेतून निधी खर्च करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. जनतेच्या आरोग्यासाठी कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही असे रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड.अनिल परब यांनी एका निवेदनाद्वारे जाहिर केले आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सध्या संपूर्ण राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु या परिस्थितीला न घाबरता आपण सर्वांनी तोंड देण्याची गरज आहे. राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, मेडिकल स्टाफ, पोलिस व इतर सर्व कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. रत्नागिरीतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मला वैयक्तिकरित्या येण्याची इच्छा असूनही अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान माझ्या डोळ्याला गंभीर इजा झाल्याने वैद्यकीय सल्ल्यानुसार मला तिकडे येता आले नाही. परंतु रत्नागिरीतील परिस्थितीवर सध्या मी बारीक लक्ष ठेऊन आहे. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असून परिस्थितीचा आढावा घेत आहे. जिल्हयातील वैद्यकीय कर्मचारी, प्रशासन, पोलीस यंत्रणा खूप मेहनत घेत असून त्यांना जनतेने संपूर्ण सहकार्य करणे गरजेचे आहे. रत्नागिरीतील या परिस्थितीला तोंड देण्यासाठी योग्य त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. रत्नागिरीतील जनता घरी राहून शासनाला सहकार्य करेल असा मला ठाम विश्वास आहे असे मत रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड.अनिल परब यांनी निवेदनाद्वारे व्यक्त केले आहे.

पुढे ॲड.परब म्हणाले की,मी रत्नागिरीतील सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी आपापल्या घरी राहून या सर्वांना सहकार्य करावे व सरकारने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. इतर देशातील परिस्थिती पाहता राज्यात आपल्या सुरक्षेसाठी कलम 144 लागू करण्यात आले आहे. तसेच सर्व जिल्ह्यांच्या सीमा सध्या बंद करण्यात आल्या आहेत. तसेच या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे असा इशारा त्यांनी निवेदनात दिला आहे.

आपण सध्या स्टेज ३ च्या उंबरठ्यावर आहोत. स्टेज ३ मध्ये या आजाराचा फैलाव सामाजिक संपर्काने वेगाने होतो. शासन पहिल्या दिवसापासून वेळोवेळी योग्य त्या सूचना करत असून आपण या सूचनांचे कठोरपणे पालन करावे. कोरोना संदर्भात काहीही लक्षणे आढळल्यास घाबरुन न जाता त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. सध्याच्या परिस्थितीत आपल्याकडे घरी राहून स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घेणे हाच एकमेव उपाय आहे असल्याचे पालकमंत्री ॲड.परब यांनी निवेदनात मांडले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या