एसटीला मिळणार मालवाहतुकीची ‘संजीवनी’; परिवहनमंत्री अनिल परब यांचा विश्वास

990

पुणे – नगर मार्गावर 1 जून 1948 ला पहिली एसटी धावली होती. यंदाच्या 1 जून रोजी एसटी 72 व्या वर्षांत पदार्पण करत आहे. गेली अनेक वर्षे एसटी तोटा सहन करीत असली तरी यंदा एसटीला मालवाहतुकीच्या रूपाने नवसंजीवनी मिळणार असल्याचे प्रतिपादन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केले आहे.

राज्य सरकारने 18 मे रोजी काढलेल्या अद्यादेशानुसार एसटी महामंडळ आपल्या बसेसमधून व्यावसायिक स्वरूपात माल वाहतूक करू शकणार आहे. त्यासाठी जुन्या एसटी बसेसमध्ये आवश्यक ते बदल करून त्यांचे रूपांतर मालवाहू वाहनात करण्यात येत आहे. सध्या एसटीकडे स्वतःची 300 मालवाहू वाहने आहेत. त्याद्वारे मालवाहतूक सुरु करण्यात आली असून त्याचा शुभारंभ रत्नागिरी येथून आंब्यांच्या पेट्या बोरिवलीला पाठवून नुकताच झाला आहे. एसटी महामंडळाचे राज्यात 250 आगार आहेत. प्रत्येक तालुका स्तरावर आगार कार्यरत आहेत. याबरोबर 31 विभागीय कार्यालये, 33 विभागीय कार्यशाळा असा मोठा विस्तार भविष्यात एसटीच्या मालवाहतुकीला पाठबळ देणारा आहे.

सध्या प्रत्येक जिल्हास्तरावर एसटीने मालवाहतुकीचे स्वतंत्र कक्ष निर्माण केले असून त्यांच्यामार्फत एम. आय. डी. सी., कारखानदार, लघु उद्योजक, कृषीजन्य व्यापारी यांच्या भेटी-गाठी घेऊन एसटीच्या मालवाहतुकीबाबत माहिती दिली जात आहे. यामध्ये शासनाची अनेक महामंडळे, व्यापार मंडळे आपला माल एसटीच्या मालवाहतुकीमधून पाठविण्यास उत्सुक असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले.

भविष्यात चांगला प्रतिसाद

गेल्या सहा दिवसात राज्यभरात 41 ट्रकसाठी मालवाहतुकीचे बुकिंग मिळाले असून पुणे, नाशिक, सातारा, सांगली, जळगाव व गडचिरोली या जिल्ह्यांनी मालवाहतुकीच्या क्षेत्रात आघाडी घेतली आहे. माफक दर, सुरक्षित व नियमित सेवेमुळे एसटीच्या मालवाहतुकीला भविष्यात चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या