सामान्य माणसासाठी झटणारा कट्टर शिवसैनिक, दिवंगत अनिल राठोड यांना सर्वपक्षीय नेत्यांची आदरांजली

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून निष्ठेचे आणि सर्वसामान्यांसाठी संघर्ष करण्याचे बाळकडू मिळालेले अनिलभैया राठोड हे कट्टर शिवसैनिक होते. स्वतःच्या कुटुंबासाठी न जगता जनतेसाठी जगणारा शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. अनिलभैयांनी जन्मभर समाजाची सेवा केली. सामान्य माणसासोबत असलेली नाळ त्यांनी कधीही तुटू दिली नाही. त्यांच्या निधनाने शिवसेनेसह जिल्ह्याची मोठी हानी झाल्याची भावना सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केली.

शिवसेना उपनेते दिवंगत अनिल राठोड यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नगरमधील नक्षत्र लॉन्समध्ये सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, शिवसेना सचिव अनिल देसाई, उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिवसेना उपनेत्या, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, खासदार प्रताप जाधव, खासदार गिरीश बापट आदी ऑनलाइन सहभागी झाले होते. तर जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, शिवसेना नगर जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, माजी आमदार विजय औटी, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, माजी महापौर सुजाता कदम, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, शहरप्रमुख दिलीप सातपुते, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, भाजपचे शहराध्यक्ष भैया गंधे, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख आशा निंबाळकर, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, सुभाष लोंढे, अनिल शिंदे, योगीराज गाडे आदी उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, अनिल राठोड यांच्याबरोबर 25 वर्षे काम करण्याची संधी मला मिळाली. कुणावरही अन्याय न केल्यानेच ते 25 वर्षे आमदार राहिले. तर राठोड यांचा जिल्ह्यात आदरयुक्त दबदबा होता. त्यांच्या निधनाने पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. अशी भावना मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

मंत्री शंकरराव गडाख म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शंकरराव तुम्ही मंत्री झालेला आहात. तुम्हाला नगर जिल्ह्यामध्ये काम करायचे आहे. तुम्हाला सर्वाधिक मदत अनिल राठोड यांच्याकडून मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांची भेट घ्या’, असे सांगितले होते. त्यानुसार मी राठोड यांची भेट घेतली. जिल्ह्यासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आता त्यांची मदत मला मिळणार नाही, ही खंत माझ्या मनात कायम राहील.

एकनाथ खडसे म्हणाले, राठोड यांनी सामान्य माणसासोबतची नाळ कधीही तुटू दिली नाही. युतीच्या काळात अनेक बैठकांचे ते साक्षीदार आहेत. अतिशय लढाऊ नेते म्हणून त्यांच्याकडे बघितले जायचे.

मंत्री सुभाष देसाई म्हणाले, अनिल राठोड हे माझे जवळचे मित्र होते. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यात त्यांचा मोठा सहभाग असायचा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ते अत्यंत विश्वासू होते. डॉ. नीलम गोर्‍हे म्हणाल्या, अनिल राठोड हे नगरमधून पाचवेळा आमदार झाले. जनतेने त्यांना मोलाची साथ दिली. त्यांच्या निधनाने जिल्हा पोरका झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या