
>> अंजली महाजन
जहाजाच्या जुन्या ‘कंटेनर’ला कल्पकतेने घराचे रूप देणारा, आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेला तरुण कलाकार हर्ष दुरुगड्डा. त्याच्या कलाकृतींतून त्याची जिद्द आणि सृजनशीलता विशेष अधोरेखित होते.
हैदराबादच्या कोलाहलापासून दूर चिलकूर गावातील एक एकर शेतात झाडांच्या सावलीत आणि खुल्या आकाशाखाली एक वेगळीच सृष्टी आकाराला येत आहे. जहाजाच्या जुन्या ‘कंटेनर’ला कल्पकतेने घराचे रूप देऊन तिथे राहणारा एक तरुण कलाकार आज जागतिक कलाविश्वात आपली मोहोर उमटवत आहे. हर्ष दुरुगड्डा असे या शिल्पकाराचे नाव असून त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावली आहे.
हर्ष यांचा जन्म मूर्तिकारांच्या समृद्ध परंपरेत झाला. कर्नूलजवळील अल्लागड्डा हे गाव मूर्तिकलेसाठी प्रसिद्ध असून हर्ष यांचे वडील हरिप्रसाद आचारी हे स्वत राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिल्पकार आहेत. बालपण दगडांच्या आणि छिन्नी-हातोडय़ाच्या आवाजात गेल्याने कला त्यांच्या रक्तातच होती. विशाखापट्टणमच्या समुद्रकिनाऱयावर काढलेले पहाटेचे तास आणि वडिलांच्या स्टुडिओत मातीशी केलेली मैत्री हीच त्यांची खरी पाठशाळा ठरली. अभ्यासाचा कोणताही ताण न घेता केवळ सर्जनशीलतेला प्राधान्य देणाऱया वातावरणामुळे हर्ष यांची विचार प्रक्रिया स्वतंत्रपणे विकसित झाली.
2017 मध्ये ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित ‘रिओ टिंटो स्कल्प्चर अवॉर्ड’ जिंकल्यानंतर हर्ष यांचे नाव जागतिक नकाशावर आले. त्यानंतर 2018 मध्ये जर्मनीतील ‘बियाफरिन अवॉर्ड’ आणि 2021 मध्ये न्यूयॉर्कमधील ‘सोदबी’ लिलावात झालेला त्यांचा सहभाग हे त्यांच्या यशाचे महत्त्वाचे टप्पे ठरले. लंडनमधील ‘द आर्टस् फॅमिली’चा दक्षिण आशियाई उदयोन्मुख कलाकार पुरस्कारही त्यांना मिळाला. मात्र, हे आंतरराष्ट्रीय यश पदरी असूनही हर्ष यांची पावले आजही जमिनीवर आहेत. भारतात त्यांच्या अमूर्त कलेला मिळणारा प्रतिसाद काहीसा संथ असला तरी प्रेक्षकांच्या जाणिवा प्रगल्भ होतील अशी त्यांना खात्री आहे. हर्ष यांची शिल्पे केवळ शोभेच्या वस्तू नाहीत. ते मानवी संवेदनांचे दृश्य स्वरूप आहेत. ‘कॉलम ऑफ साऊंड‘ या त्यांच्या प्रसिद्ध कलाकृतीत त्यांनी ध्वनिलहरींचे रूपांतर एका भव्य शिल्पात केले आहे. संगीत आणि भूमिती यांचा हा संगम प्रेक्षकांना थक्क करतो. पोलाद, संगमरवर आणि दगड अशा विविध माध्यमांत काम करताना ते त्या पदार्थाचा मूळ स्वभाव जपण्याचा प्रयत्न करतात. राजस्थान किंवा आंध्र प्रदेशातील खाणींमधून दगड निवडण्यापासून ते भव्य शिल्पे उभारण्यासाठी अवजड यंत्रसामग्री वापरण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अत्यंत कष्टसाध्य आहे. एक शिल्प पूर्ण करण्यासाठी त्यांना किमान तीन महिन्यांचा कालावधी लागतो. चिलकूरमधील त्यांचे निवासस्थान त्यांच्या जीवनशैलीचे प्रतिबिंब आहे. कलेच्या जगातील झगमगाटापासून दूर राहून निसर्गाच्या सानिध्यात राहणे त्यांना अधिक भावते. निसर्गातील कीटकांच्या घरांची रचना असो वा पर्यावरणाचे तत्त्वज्ञान, त्यातून ते प्रेरणा घेतात. केवळ डोळ्यांना सुखावणारी कला निर्माण करण्यापेक्षा पाहणाऱयाला विचार करायला लावणारी आणि त्याच्या दृष्टिकोनाला आव्हान देणारी शिल्पे घडवण्यावर त्यांचा भर असतो.
वारसा हक्काने मिळालेली कला आणि आधुनिक जागतिक तंत्रज्ञान यांचा सुरेख मेळ हर्ष यांच्या कामात दिसून येतो. चिलकूरच्या त्या छोटय़ाशा शेतातून सुरू झालेली ही कला साधना आज जगातील मोठय़ा दालनांमध्ये दिमाखात उभी आहे. हर्ष दुरुगड्डा यांची ही झेप भारतीय आधुनिक कलेच्या बदलत्या आणि विस्तारत्या क्षितिजाची नांदी आहे.



























































