
>> अंजली महाजन
चिन्मयी बालभद्रपत्रुनी ही भारतीय वंशाची तरुणी, अमेरिकन सरकारसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) धोरण सल्लागार म्हणून कार्यरत असतानाच तिने कुचिपुडी या शास्त्रीय नृत्य प्रकारातही नैपुण्य सिद्ध केले आहे.
अमेरिकेतील मेरीलँडमधील एका मंदिरात लहानपणी आपल्या पालकांसोबत जाणारी चिन्मयी बालभद्रपत्रुनी आज एकाच वेळी दोन भिन्न जगांचे प्रतिनिधित्व करत आहे. एका बाजूला ती अमेरिकन सरकारसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) धोरण सल्लागार म्हणून कार्यरत आहे, तर दुसऱया बाजूला ती कुचिपुडी या भारतीय शास्त्राrय नृत्यशैलीतील एक निष्णात नृत्यांगना आणि शिक्षिका आहे.
मुळांशी जोडलेले बालपण
1996 मध्ये अवघ्या दोन वर्षांची असताना चिन्मयी बालभद्रपत्रुनीने आपल्या पालकांसोबत अमेरिकेत स्थायिक झाली. तिचे संगोपन व्हर्जिनियामध्ये एका मध्यमवर्गीय स्थलांतरित कुटुंबात झाले. तिचे पालक आपल्या संस्कृतीशी असलेल्या नात्याबाबत अत्यंत जागरूक होते. दर आठवडय़ाला मंदिरात जाणे, ‘बालविहार’ वर्गांना उपस्थित राहणे आणि विष्णुसहस्रनामाचे पठण करणे हा तिच्या दिनचर्येचा भाग होता. मला देवदेवतांच्या गोष्टींचे प्रचंड आकर्षण होते आणि त्यातूनच मी संपूर्ण विष्णुसहस्रनाम’ मुखोद्गत केले, असे ती सांगते.
भारतीय संस्कृती केवळ तिच्या आठवणींचा भाग नसून ती तिची ओळख बनली आहे. 2001 मध्ये एका मंदिरातील कार्यक्रमात ‘आंदाल कल्याणम्’चा प्रयोग पाहताना चिन्मयी कुचिपुडीकडे आकर्षित झाली. तिने मृणालिनी सदानंद यांच्या ‘कलमंडपम’ या नृत्यशाळेत प्रवेश घेतला. सुरुवातीची तीन वर्षे तिच्यासाठी सोपी नव्हती. माझ्याकडे जन्मजात प्रतिभा नव्हती. त्यामुळे सुरुवातीला मला यश मिळत नव्हते, अशी प्रांजळ कबुली ती देते. मात्र 2005 मध्ये गुरू विठ्ठल पसुमार्थी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या एका शिबिराने तिचे आयुष्य बदलले. तिथे ती स्वतःला विसरून पात्राशी एकरूप व्हायला शिकली आणि एका सामान्य विद्यार्थिनीपासून ती एक प्रबळ नृत्यांगना बनली.
चिन्मयी सध्या सार्वजनिक धोरणातील आपल्या शैक्षणिक पार्श्वभूमीच्या जोरावर अमेरिकन सरकारसाठी एआय धोरण सल्लागार म्हणून काम करते. तंत्रज्ञान आणि सरकार हे करदात्यांच्या फायद्यासाठी असले पाहिजे, असे तिचे ठाम मत आहे. त्याच वेळी ती कलेकडे केवळ आध्यात्मिक दृष्टीने न पाहता ती राजकीय आणि सामाजिक बदलाचे साधन असल्याचे मानते. शास्त्राrय नृत्याची आवड तरुणांमध्ये कमी होत नसून ती काळानुसार बदलत आहे, असे तिचे निरीक्षण आहे. योग्य संदर्भ आणि स्पष्टतेसह शिकवल्यास आजची पिढी शास्त्राrय कलेला उत्तम प्रतिसाद देते, असा तिचा विश्वास आहे.
वारसा आणि वाटचाल
अध्यापन हा चिन्मयीच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. न्यूयॉर्कमध्ये स्थायिक असलेली चिन्मयी आता ‘चिन्मय मिशन’च्या माध्यमातून हालचालींतून कथा सांगण्याचे कार्यशाळा घेत आहे. याशिवाय ती ‘असीम कला इनिशिएटिव्ह’शी जोडली गेली असून जिथे भारतीय शास्त्राrय नृत्य आणि वैद्यकीय क्षेत्राचा समन्वय साधला जातो. आपल्या नृत्याचे कपडे स्वतः शिवण्यापासून ते स्वयंपाकापर्यंतच्या विविध छंदांमध्ये ती रमते. तिचे पती साई सुमन पेड्डी हे तिच्या या प्रवासात तिचे सर्वात मोठे समर्थक आहेत. आपल्या भाचीला कुचिपुडी शिकताना पाहून आपला सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीकडे सुपूर्द होत असल्याचा आनंद तिला मिळतो.



























































