अंकुर मित्तलचा डबल निशाणा, वर्ल्ड नेमबाजी चॅम्पियनशिप डबल ट्रॅप प्रकारात जिंकले सुवर्ण

सामना ऑनलाईन । चँगवोन

हिंदुस्थानी खेळाडूंची आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये (नेमबाजी) पदकांची लयलूट शनिवारीही सुरूच राहिली. अंकुर मित्तल याने पुरुषांच्या डबल ट्रपमध्ये सुवर्णपदकाचा वेध घेतला. त्यानंतर त्याने मोहम्मद असाब व शार्दुल विहान यांच्या साथीने पुरुषांच्या सांघिक प्रकारात कांस्यपदकावर नाव कोरले. हिंदुस्थानच्या नेमबाजांनी या स्पर्धेत आतापर्यंत सात सुवर्ण, सात रौप्य व सहा कांस्यपदकांसह एकूण 20 पदकांवर मोहोर उमटवली आहे. हिंदुस्थानचा संघ दुसर्‍या स्थानावर असून कोरिया पहिल्या स्थानावर तर चीन तिसर्‍या स्थानावर आहे. तसेच हिंदुस्थानच्या दोन खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिकची तिकिटेही बुक केलीत हे विशेष.

26 वर्षांच्या अंकुर मित्तल याने 150 पैकी 140 गुणांची कमाई केली. शूटऑफमध्ये त्याने चीनच्या यियांग यँग व स्लोवाकियाच्या हबर्ट आंद्रजेझ यांना हरवले. चीनच्या यियांग यँगने रौप्य तर स्लोवाकियाच्या हबर्ट आंद्रजेझ याने कांस्यपदक जिंकले.

अंकुर मित्तल, मोहम्मद असाब व शार्दुल विहान यांनी हिंदुस्थानला पुरुषांच्या सांघिक प्रकारात कांस्य पदक मिळवून दिले. हिंदुस्थानने 409 गुणांची कमाई केली. इटलीने 411 गुणांसह सुवर्ण तर चीनने 410 गुणांसह रौप्यपदकावर हक्क सांगितला.