अंकुश राणे खूनप्रकरणी नारायण राणे गप्प का? खासदार विनायक राऊत यांचा सवाल

5270

अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी तत्परता दाखवून टाहो फोडणारे भाजपाचे खासदार नारायण राणे आपला चुलत भाऊ अंकुश राणे यांच्या खून प्रकरणी गप्प का? असा खडा सवाल शिवसेना सचिव तथा संसद गटनेते खासदार विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केला. दरम्यान निरपराध चार व्यक्तींच्या 2002 सालापासून सिधुदुर्ग जिल्ह्यात ज्या हत्या झाल्या, त्या प्रकारणाची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे करणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली. कुडाळ येथील पंचायत समितीच्या सभागृहात राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा परिषद गट नेते नागेंद्र परब, सभापती नूतन आईर आदी उपस्थित होते

यावेळी राऊत म्हणाले की, सिंधुदुर्गात गेल्या काही वर्षात सत्यविजय भिसे, रमेश गोवेकर, अंकुश राणे, रमेश मणचेकर यांचे खून झाले. त्यावेळी स्वत: राणे मंत्रीपदावर होते. तरीसुद्धा त्यांनी या प्रकरणांची चौकशीची मागणी केली नाही. पण आता आम्ही या चारही खुनाचा तपास उच्चस्तरीय झाला पाहिजे यासाठी पाठपुरावा करणार आहोत.

नाणार रिफायनरी स्थानिकांना नकोय, दलालांना हवीय

नाणार रिफायनरी संदर्भात काहींच्या पोटातील जठाराग्नी आता वळवळायला लागला आहे याचे कारण 220 गुजराती भूमााफियांनी 2200 एकर जमिनी घेतल्या. त्याची दलाली या जठारांनी केली ती आता नष्ट झाली आहे. त्यांना कोकणच्या हीताची काळजी नसून दलालांची काळजी आहे. रिफायनरीकरीता राजापूर व गिर्ये रामेश्वर या भागात रिफायनरीसाठ ज्या जमीनी खरेदी केल्या आहेत त्या सर्व जमिनीच्या खरादी-विक्रीचे व्यवहार रद्द करण्याची मागणी मी स्वत: केलेली आहे. त्यामुळे भविष्यात नाणार रिफायनरी हा विषय संपला आहे. आठ दिवसांपूर्वी मी त्या भागाला भेट दिली तेव्हाही स्थानिकांनी रिफायनरीला विरोध केला आहे. रिफायनरी ही स्थानिकांना नको तर दलाली करणाऱ्यांना हवी आहे. त्यामुळे दलालांच्या दबावाला बळी पडणारे सरकार नाही. नारायण राणे व नितेश राणे या पिता पुत्रांनी त्यावेळी राजकारणातून संन्यास घेऊ पण रिफायनरीचे समर्थन करणार नाही असे सांगितले होते मात्र तेच राणे पिता पुत्र आता या रिफायनरीचे गोडवे गात आहेत. सत्ता व स्वार्थासाठी रंग बदलणारी एकमेव व्यक्ती म्हणजे नारायण राणे आहेत अशा शब्दात विनायक राऊत यांनी घणाघात केला.

आपली प्रतिक्रिया द्या