
गेल्या काही दिवसांपासून मौनव्रत करत असलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती नेहमीप्रमाणेच उत्तम असल्याचा खुलासा करण्यात आला आहे. नगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी येथील अण्णा हजारे यांच्या कार्यालयातूनच हा खुलासा करण्यात आला आहे.
देशभरात महिलांवर सातत्याने होणारे अत्याचार व गुन्हेगारांना शिक्षेची अंमलबजावणी करण्यात होत असलेली अंमलबजावणी याच्या निषेधार्थ आत्मक्लेश म्हणून ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात मौन व्रत सुरू आहे. दरम्यान अण्णा यांची प्रकृती खालावली असल्याचे काही संदेश सोशल मीडियावर फिरत आहेत. त्या संदेशांमुळे राळेगणसिद्धी येथील अण्णांच्या कार्यालयात सतत फोन येत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयीचा खुलासा कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे.
अण्णांची प्रकृती नेहमीप्रमाणे सामान्य व स्थिर आहे. त्यांना कोणताही त्रास नाही. दिवसभर अनेक कार्यकर्ते, शालेय विद्यार्थी भेटायला येतात. मौन असल्यामुळे अण्णा त्यांच्याशी लेखी संवाद साधत आहेत, असं या खुलाश्यात नमूद करण्यात आलं आहे. तसंच, अण्णांच्या प्रकृतिविषयी कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही. काही समाजकंटक व विकृत विचारसरणीचे लोक जाणीवपूर्वक अण्णांच्या प्रकृतिविषयी व इतर प्रकारे अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन खोट्या बातम्या पसरवीत आहेत. न्यूज चॅनलचे टीव्ही स्क्रिन एडीट करून काही अशुभ बातम्या पसरविण्यापर्यंत अशा प्रवृत्तींची मजल गेलेली आहे. यासाठी सोशल मीडियाचा सर्रास गैरवापर सुरू आहे. त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन अण्णा हजारे यांच्या कार्यालयाकडून करण्यात येत आहे.





























































