मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वगळता कोणीही पत्राला उत्तर दिले नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात लोकायुक्त कायदा करण्यासाठी आपण वेळोवेळी पत्रव्यवहार केला, पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच केवळ आपल्याला प्रतिसाद दिल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात अण्णा हजारे यांनी म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अनेकदा पत्रव्यवहार करूनही लोकायुक्ताची नियुक्ती न झाल्याने राळेगणसिद्धीत आंदोलन करण्यात आले होते. फडणवीस यांनी राळेगणसिद्धीत येऊन सहा तास चर्चा करून सरकारचे प्रतिनिधी तसेच माझे सहकारी यांचे प्रत्येकी पाच सदस्य असलेल्या मसुदा समितीची नियुक्ती करण्यात येईल. तसेच लवकरात लवकर कायद्याचा मसुदा तयार करण्यात येऊन विधानसभेत कायदा करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. आश्वासनाप्रमाणे मसुदा समितीच्या बैठका झाल्या. लोकायुक्तांसाठी लोकसभेत घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे प्रत्येक मुद्दय़ावर समितीमध्ये चर्चा करून मसुदा तयार करण्यात आला व तो विधानसभेत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राज्यात सत्तांतर होऊन आघाडी सरकार सत्तेवर आले. त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच महसूलमंत्री यांना पत्रव्यवहार करण्यात आला, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोडून कोणाचेही पत्रास उत्तर आले नसल्याचे हजारे यांनी या पत्रात नमूद केले आहे. समितीचे अध्यक्ष अजोय मेहता यांना करण्यात आलेल्या पत्रव्यवहारासही प्रतिसाद मिळाला नसल्याची खंत हजारे यांनी व्यक्त केली.