‘जीव वाचवण्यासाठी पळताना मी पडले आणि त्या टोळीच्या हाती लागले…’; मणिपुरातील आणखी एक भयंकर सामूहिक बलात्कार उघड

manipur-violence
फाईल फोटो

हिंसाचाराच्या घटनांनी मणिपूर अजूनही धूमसत आहे. अशातच मे महिन्याच्या सुरुवातीला मणिपूरमधील वांशिक संघर्षांदरम्यान लैंगिक अत्याचाराचे आणखी एक अत्यंत भयंकरप प्रकरण समोर आलं आहे. मदत छावणीत राहत असणाऱ्या पीडित महिलेनं डॉक्टरांच्या मदतीनं पोलिसात केस दाखल केली आहे.

मणिपूरमधील अधिकाधिक स्त्रिया पोलिसांकडे येऊन त्यांना सहन कराव्या लागलेल्या धक्कादायक गोष्टी आणि त्यांना सहन करावा लागलेला अत्याचार सांगू लागल्या आहेत. पोलीस आणि स्थानिक प्रशासकीय अधिकारी त्यांना घडलेल्या घटनांवर बोलण्यासाठी धीर देत आहेत.

गुन्हा नोंदवण्यात आलेलं ताजं प्रकरण हे मणिपूरच्या चुराचंदपूर जिल्ह्यातील आहे. एका 37 वर्षीय महिलेनं आरोप केला की तिचं घर पेटवल्यानंतर ती तिची दोन मुलं, भाची, वहिनीसोबत जीव वाचवण्यासाठी पळत होती. ती पडल्यानंतर तिला उठता येईना मात्र त्याचवेळी तिथे आलेल्या एका टोळीनं तिला पकडलं आणि सामूहिक बलात्कार केला. ही घटना 3 मे रोजीची आहे. या दिवशी बहुसंख्य कुकींनी अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढला होता. ज्यानंतर जिल्ह्यात हिंसाचार उसळला होता.

ती म्हणाली की, महिलांना ज्या भयंकर प्रसंगांना सामोरं जावं लागतं त्याबद्दल अन्य महिलांना बोलताना पाहून तिनं पोलिसांकडे जाण्याचं धाडस दाखवलं.

‘मी स्वतःची आणि माझ्या कुटुंबाची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी आणि सामाजिक वंचिततेपासून वाचण्यासाठी ही घटना उघड केली नव्हती. ही तक्रार दाखल करण्यास उशीर सामाजिक कलंक लागेल या भितीनेच झाला आहे. या घटनेनंतर मी स्वतःला संपवाव असं मला अनेकदा वाटत होतं’, असं महिलेनं सांगितलं.

बुधवारी विष्णुपूर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या ‘एफआयआर’सोबत तिचं निवेदन जोडलेलं आहे.

ती आता विस्थापित लोकांसाठीच्या मदत छावणीत राहत आहे. IPC च्या कलम 376D, 354, 120B आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एफआयआर नुसार, 3 मे रोजी संध्याकाळी 6.30 वाजता, बदमाशांनी महिला आणि तिच्या शेजाऱ्यांची घरे जाळण्यास सुरुवात केली, त्यानंतर ती, तिचे दोन मुलगे, भाची आणि वहिनी जीव वाचवण्यासाठी पळत निघाले.

‘मी माझ्या भाचीला माझ्या पाठीवर घेऊन माझ्या दोन मुलांनाही धरले आणि माझ्या वहिनी सोबत तिथून पळू लागले. ती पण एक बाळ तिच्या पाठीवर घेऊन माझ्या पुढे धावत होती. मग मी अडखळले आणि खाली पडले. रस्त्यात आणि उठू शकले नाही… माझी वहिनी माझ्याकडे धावत परत आली आणि तिने माझ्या भाचीला माझ्या पाठीवरून उचलले आणि मी आग्रह केल्याप्रमाणे माझ्या विनवणीनंतर माझ्या दोन मुलांनाही सोबत घेऊन पुढे गेली. मला लागले असल्यानं उठता येईना. तेव्हा काही पाच-सहा… बदमाशांनी मला पकडलं… त्यांनी मला शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. माझ्या प्रतिकारानंतरही मला बळजबरीनं पुन्हा खाली पाडण्यात आलं. यानंतर, पुरुषांनी लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केली’, असं महिलेनं एफआयआरमध्ये म्हटलं आहे.

महिलेने सांगितले की तिची तब्येत पूर्णपणे बिघडली असून आत्महत्या करून मरण्याचा विचारही केला. ती म्हणाली की ती राज्याची राजधानी इंफाळमधील रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये गेली होती, परंतु डॉक्टरांना न भेटता परत आली कारण ती स्वतःला ‘व्यक्त’ देखील करू शकत नव्हती.

त्यानंतर, तिची तब्येत बिघडल्याने ती मंगळवारी इंफाळमधील जेएनआयएमएस रुग्णालयात गेली, असं तिनं सांगितलं. तिथल्या डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले आणि समुपदेशन केले आणि पोलिसांना माहिती देण्यासाठीचं सामर्थ्यही तिला दिलं.

‘…माझी कोणतीही चूक नसताना माझ्यावर अत्याचार झाले. मला किती आघात आणि त्रास सहन करावा लागला याची मला जाणीव होऊ लागली. माझ्यावर अत्याचार, लैंगिक आणि शारीरिक अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळीला कठोर शिक्षा झाली पाहिजे’, असं ती म्हणाली. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

गेल्या महिन्यात, मणिपूरमधील पुरुषांच्या एका गटाद्वारे दोन महिलांना रस्त्यावर नग्न करून धिंड काढल्याचा एक भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आला होता, ज्यावरून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करण्यात आला आणि कारवाईची मागणी करण्यात आली. व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मणिपूर पोलिसांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, 3 मे ते 30 जुलै या सुमारे तीन महिन्यांच्या कालावधीत 6,500 हून अधिक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.