
सामना प्रतिनिधी । घनसावंगी
मराठा आरक्षणासाठी पेटलेल्या आंदोलनाची धग अजूनही कायम असून आरक्षणाच्या मागणीसाठी घनसावंगी येथील गणेश तुकाराम नन्नवरे (४०) यांनी रविवारी विष प्राशन करून आत्महत्या केली. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याची दोन पानांची चिठ्ठी त्यांच्या खिशात आढळून आली. चिठ्ठीत मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने सरकारचे हे अपयश असून हे सगळं दिसत असताना मुख्यमंत्री काय झोपले का. तुमच्या राज्यात हे काय चाललं. आता अंत पाहू नका, आरक्षण देऊन टाका आम्ही बरबाद झालो, पुढची पिढी होणार नाही. आम्हाला पण जगण्याची इच्छा आहे, पण वाघा सारखं जगवा. माझे मित्र व कुटुंबाने मला माफ करावे आपला क्रांती हुतात्मा.’ अशा चिठ्ठीचे एक पान व दुसर्या पानावर ‘आजचा पेपर वाचून निराश झालो. आता काहीही खरं वाटत नाही. असे म्हणत आरक्षण मिळालेच पाहिजे’ असे ३२ वेळा लिहिले.
घटनेची माहिती मिळताच घनसावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, उपनिरीक्षक अंकुश पाटोळे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. यावेळी गणेश नन्नवरे यांना हुतात्मा घोषित करा, त्याच्या कुटुंबाला तात्काळ ५० लाखाची मदत देऊन कुटुंबातील एकाला शासकीय नोकरीत घेण्याची मागणी त्याच्या नातेवाईकांनी केली.























































