स्वदेशी बनावटीच्या ‘विक्रांत’ युद्धनौकेची आणखी एक चाचणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका ‘विक्रांत’च्या आणखी एका चाचणीला रविवारी सुरुवात झाली. या युद्धनौकेच्या अंतिम टप्प्यातील सागरी चाचण्या होत असून चाचण्या पूर्ण झाल्यानंतर ही युद्धनौका हिंदुस्थानी नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. त्यामुळे नौदलाचे सामर्थ्य वाढणार असल्याने हिंदुस्थानविरोधात कुरापती करणाऱया चीन आणि पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत.

कोचीन शिपयार्डमध्ये उभारणी करण्यात आलेल्या या विमानवाहू युद्धनौकेच्या उभारणीचा कार्यक्रम 2009 साली सुरू झाला होता. पुढील चार वर्षांतच म्हणजे 2013 मध्ये ही युद्धनौका बांधून पूर्ण झाली आणि तिचे जलावतरण करण्यात आले होते. युद्धनौकेवर बसविण्यात आलेली 75 टक्के उपकरणे स्वदेशी बनावटीची आहेत. 40 हजार टन वजनाची विमानवाहू युद्धनौका 262 मीटर लांब आणि 62 मीटर रुंद आहे. युद्धनौकेवर 30 लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर्स राहू शकतील.