भजनसम्राट अनुप जलोटा झळकणार बायोपिकमध्ये, सत्यसाईबाबांची भूमिका मिळणं हे भाग्यच!

ऐसी लागी लगनसारख्या शेकडो भक्तीगीतांद्वारे हिंदुस्थानींच्या हृदयात आपले अढळ स्थान निर्माण करणारे भजनसम्राट अनुप जलोटा यांच्या अभिनयाची जादू आता मोठय़ा पडद्यावर दिसणार आहे. आगामी सत्यसाईबाबा या बायोपिकमध्ये ते मुख्य भूमिका साकारणार असून या भूमिकेतील त्यांचा हुबेहूब लूक सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

या भूमिकेसाठी तुमची निवड कशी झाली हे विचारताच अनुप जलोटा म्हणाले, हा केवळ योगायोग आहे. खरंतर या चित्रपटासाठी दोन गाणी गायला मी गेलो होतो. रेकॉर्डिंगच्या वेळी चित्रपटात मुख्य भूमिका कोण साकारतेय, असा प्रश्न मी उत्सुकतेपोटी निर्मात्यांना विचारला. त्यावर दोन्ही वेळेस आपण कलाकाराच्या शोधात असल्याचे त्यांनी सांगितले. माझा लूक बाबांशी मिळताजुळता असल्याने माझी लूक टेस्ट करा, अशी मी त्यांना विनंती केली. वेशभूषा करून येताच या भूमिकेसाठी माझ्या नावावर शिक्कामोर्तब झालं.

सत्यसाईबाबा यांच्या भेटीबद्दलची आठवण सांगताना ते म्हणाले, वयाच्या 12 व्या वर्षी मी त्यांना भेटलो होतो. त्यावेळी मला ते प्रेमाने छोटे बाबा म्हणायचे. तुम्ही मला छोटे बाबा का म्हणता, असा प्रश्न विचारल्यावर तुला ते लवकरच कळेल, असे बाबा मला त्यावेळी म्हणाले होते. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आज मला उलगडतोय. मी स्वतः बाबांचा भक्त आहे. त्यामुळे त्यांची भूमिका साकारायला मिळणं हे भाग्यचं असल्याचे जलोटा म्हणाले. 22 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

आपली प्रतिक्रिया द्या