अहमदाबादमध्ये फसवणुकीची एक धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यावसायिकाला बनावट नोटा देऊन त्याची 1 कोटी 30 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. व्यापाऱ्याला बनावट नोटा देण्यात आल्या. या नोटांवर महात्मा गांधींच्या ऐवजी बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचा फोटो लावण्यात आला होता. या खोट्या नोटांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावर आता स्वत: अभिनेते अनुपम खेर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बनावट पैशांचे फोटो आता व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये 500 रुपयांच्या नोटांचे बंडल पेपरमद्ये गुडाळून ठेवल्याचे दिसत आहे. तसेच या नोटांवर अनुपम खेर यांचा फोटो दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन व्यक्तींनी अहमदाबादच्या एका ज्वेलर्सच्या व्यवस्थापकासोबत 2100 ग्रॅम सोन्याचा सौदा केला. हा सौदा 1.60 कोटी रुपयांना झाला होता. फसवणूक करणाऱ्यांनी व्यावसायिकाला 1 कोटी 30 लाख रुपये दिले आाणि तेथून निघून गेले.
व्यावसायिकाने पैसे पाहण्यासाठी बॅग उघडली असता त्यात 500 रुपयांच्या नोटांचे बंडल आढळून आले. मात्र त्या नोटांवर
स्टेट बँक ऑफ इंडियाऐवजी स्टार्ट बँक ऑफ इंडियाचा शिक्का होता. हे पाहून व्यावसायिकाला धक्का बसला. त्यामुळे त्याने नोटा उघडून पाहिल्या तर त्यावर गांधीजींऐवजी अनुपम खेर यांचा फोटो होता. यावेळी व्यावसायिकाला आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. व्यावसायिका पोलिसात लगेचच तक्रार दाखल केली.
View this post on Instagram
अहमदाबादमधील फसवणुकीची आणि त्या नोटांचे फोटो पाहून अभिनेते अनुपम खेर यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली. खेर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर बातमीची क्लिप शेअर केली आहे. “लो जी कर लो बात! 500 रुपयांच्या नोटेवर गांधीजींच्या फोटोऐवजी माझा फोटो? आजच्या काळात काहीही होऊ शकते!” असे ते म्हणाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींचाही शोध सुरू केला आहे.