
यापुढे हिंदुस्थानवर दहशतवादी हल्ला झाल्यास ही युद्धाची कृती म्हणून समजली जाईल. या दहशतवादी कारवायांना युद्ध समजून सडेतोड उत्तर दिले जाईल, असा कडक इशारा हिंदुस्थान सरकारने पाकिस्तानला दिला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानी लष्कराने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. त्यानंतर हिंदुस्थान सरकारने कडक शब्दांत पाकिस्तान सरकारला सुनावल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयातील उच्चस्तरीय सूत्रांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देण्याच्या अनुषंगाने दीर्घ चर्चा झाली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने हिंदुस्थानला लक्ष्य करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. अशा हल्ल्यांना यापुढेही सडेतोड आणि चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे मोदी म्हणाले.
परराष्ट्र सचिवांचा निर्वाणीचा इशारा
पाकिस्तानने युद्धविरामाचे काही तासांत घोर उल्लंघन केले आहे. लष्कराला ठोस आणि कठोर पावले उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कारवाईचे पूर्ण स्वातंत्र्य लष्कराला आहे. जी स्थिती आता उद्भवेल त्याला पूर्णपणे पाकिस्तान जबाबदार असेल. पाकिस्ताने या सगळ्याचा गांभीर्याने विचार करावा आणि ही घुसखोरी तत्काळ थांबवावी, असा इशारा शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱया पाकिस्तानला परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी रात्री 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन दिला.
सशस्त्र दलांना सलाम
आपल्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या आपल्या सशस्त्र दलांना सलाम अशा शब्दांत अशी प्रतिक्रीया शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. सीमावर्ती राज्ये, जिल्हे, गावे आणि तेथील नागरिकांना त्यांच्या धैर्य, शौर्य आणि सामर्थ्यासाठी मानाचा मुजरा! गेल्या काही दिवसांत त्यांनी जे अनुभवले आहे, त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. युद्धसदृश परिस्थितीतही आपल्या नागरी सेवा अबाधित रहाव्यात यासाठी सतत कार्यरत असलेल्या प्रशासकीय सेवांनाही सलाम. जय हिंद! असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानचे शेपूट वाकडेच
पाकिस्तानचे शेपूट वाकडेच असल्याचे त्यांच्या संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यावरून पुन्हा समोर आले. ख्वाजा आसिफ यांनी देशाला आनंद आणि सन्मान दिल्याबद्दल पाकिस्तानी सैन्याचे अभिनंदन केले. तसेच आज पाकिस्तानी सैन्याने जगाला सांगितले की, पाकिस्तानी संरक्षण व्यवस्था भेदणे अशक्य आहे, अशी दर्पोक्तीही त्यांनी केली आहे. तर पाकिस्तानचे माजी उपपंतप्रधान आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे भाऊ नवाज शरीफ यांनी युद्धबंदीबद्दल पाकिस्तानी सैन्य आणि सरकारचे अभिनंदन केले. पाकिस्तान हा शांतताप्रिय देश आहे. शांततेला प्राधान्य देतो, परंतु त्यांना देशाचे संरक्षण कसे करायचे हे माहीत आहे, असेही ते म्हणाले.
दहशतवादाविरोधात कारवाई थांबणार नाही – एस जयशंकर
हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी करार झाला. परंतु अवघ्या काही तासांतच पाकिस्तानने या कराराचे उल्लंघन केले. त्यापूर्वी करार झाल्यानंतर लगेचच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी युद्ध थांबले नसले तरीही दहशतवादाविरोधातील कारवाई थांबणार नाही, असे ‘एक्स’वरून ठणकावले. दहशतवादाविरोधातील हिंदुस्थानची भूमिका अद्यापि कायम असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये 76 वर्षांत सहा वेळा शस्त्रसंधी
27 जुलै 1949 – 1947-48 चे पहिले कश्मीर युद्ध- हिंदुस्थान आणि पाकिस्तानच्या सैन्यप्रमुखांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या उपस्थितीत शस्त्रसंधी केली होती.
23 सप्टेंबर 1965 – 1965 चे हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध- सोव्हिएत संघ आणि अमेरिकेच्या मध्यस्थीने शस्त्रसंधी करार करण्यात आला. 1966 मध्ये ताश्पंदमध्ये तत्कालीन पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्राr आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती आयूब खान यांनी करारावर सह्या केल्या.
17 सप्टेंबर 1971- हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध- शिमला करार करण्यात आला. 1949 रोजी पुन्हा नियंत्रण रेषा आखण्यात आली.
25 नोव्हेंबर 2003- 1999 च्या कारगिल युद्धानंतर सीमेवर गोळीबार- हिंदुस्थान आणि पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर पूर्ण शस्त्रसंधी कराराला सहमती दर्शवली.
25 फेब्रुवारी 2021- 2003 च्या कराराचे उल्लंघन- हिंदुस्थान आणि पाकिस्तानच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स यांनी संयुक्त घोषणा केली. 2003 च्या शस्त्रसंधी कराराला पुन्हा सहमती दर्शवली.
10 मे 2025 पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 निरपराध पर्यटकांचा बळी गेला. त्यानंतर 6 मे रोजी रात्री हिंदुस्थानने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त केले तसेच पाच मोस्ट वॉण्टेड दहशतवाद्यांचा खात्मा केला. हल्ल्यांच्या चार दिवसांनंतर अमेरिकेच्या मध्यस्थीत शस्त्रसंधी करार झाला, परंतु कराराच्या काही तासांत पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.