नीरजला रौप्यपदक मिळाले असले तरी आम्ही खूप आनंदी आहोत. हे सुवर्णपदक मिळण्यासारखेच आहे. नीरज जखमी होता, तरीही त्याने चांगली कामगिरी केली याचा आम्हाला अभिमान आहे, अशा भावना व्यक्त करत नीरजची आई सरोज देवी यांनी सुवर्णपदक विजेता पाकिस्तानी भालाफेकपटू नदीमचेही अभिनंदन केले.
नदीम सुवर्णपदक जिंकला त्याचाही मला आनंद आहे. सर्वच खेळाडू मला मुलासारखे आहेत, असे सरोज देवी म्हणाल्या. त्याचवेळी सीमेपलीकडून नीरजचे कौतुक झाले. नीरजही माझ्या मुलाप्रमाणेच आहे. तो नदीमचा मित्र आणि त्याचा भाऊही आहे. जय-पराजय हा खेळाचा भाग आहे. देव त्याच्यावर कृपादृष्टी ठेवो. त्यानेही अनेक पदकं जिंकावीत. मी नीरजसाठीही प्रार्थना करते, असे नदीमची आई म्हणाली. नीरजच्या आईला ‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ शोएब अख्तरने तर सॅल्यूट ठोकला. ज्याने सुवर्णपदक जिंकले तोही माझाच लेक, या भावना केवळ एक आईच व्यक्त करू शकते, असे शोएब म्हणाला.