
एसटीचा प्रवास म्हणजे सुरक्षित प्रवास हे समीकरणच झाले आहे. राज्यातील सर्वात सुरक्षित परिवहन सेवा म्हणून सर्वसामान्याच्या हक्काच्या एसटीकडे पाहिले जाते. हा सुरक्षित प्रवास घडवण्यात चालकांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे 25 वर्षांहून अधिक काळ विनाअपघात सेवा बजावलेल्या तब्बल 780 चालकांचा प्रजासत्ताकदिनी गौरव केला जाणार आहे.
एसटी महामंडळाच्या दररोज राज्याच्या कानाकोपऱयात 14 हजारहून अधिक बस धावत असून 50 लाख प्रवास करतात. मात्र एसटीचे चालक काटेकोरपणे आपले कर्तव्य बजावत असल्याने दर एक लाख किलोमीटरला एसटी चालकाच्या अपघाताचे प्रमाण केवळ 0.17 टक्के एवढे कमी आहे. त्यामुळेच एसटीचा प्रवास इतर खासगी वाहनांच्या तुलनेत खूपच सुरक्षित मानला जातो. त्याची दखल घेत एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयामार्फत विनाअपघात सेवा बजावलेल्या चालकांना प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.



























































