कोल्हापूरातील महालक्ष्मीची मूर्ती सुस्थितीत; पुरातत्व खात्याची माहिती

करवीर निवासिनी श्रीअंबाबाई (महालक्ष्मी) मूर्तीची कोणतीही झीज झालेली नाही. मूर्ती चांगल्या स्थितीत असून तिला कोणताही धोका नसल्याचे पुरातत्व खात्याच्या रसायनतज्ञांच्या निरिक्षणात हे स्पष्ट झाली आहे. मात्र, मंदिरातील श्रीमहाकाली आणि श्री महासरस्वती मुर्तींची झीज झाली असून या मुर्तीचे रासायनिक जतन प्रक्रिया (केमिकल कंन्झर्व्हेशन) करणे आवश्यक असल्याचे पश्चिम क्षेत्राचे पुरातत्व रसायनतज्ञ उपअधीक्षक श्रीकांत मिश्रा यांनी सांगितले.

पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून 2015 मध्ये श्री अंबाबाई मूर्तीचे रासायनिक संवर्धन करण्यात आले होते. पुरातत्व सर्वेक्षण विभागाने पुन्हा या मूर्तीची पाहणी केली असता ही मूर्ती सुस्थितीत असून केवळ देवीच्या चरणालगत थोडीशी झीज झाल्याचे आढळून आले आहे. लवकरच या भागावर रासायनिक संवर्धन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. कोरोना लॉकडाऊन काळ मूर्ती संवर्धन प्रक्रीयेसाठी वरदान ठरल्याचेही मिश्रा यांनी यावेळी सांगितले.

संपुर्ण मंदिरात काही प्रमाणात कार्बनचा थर बसल्याचे दिसून आले आहे. तो काढून संपूर्ण मंदिर स्वच्छ करणे आवश्यक असल्याचे सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग पुणेचे विलास वाहणे यांनी यावेळी सांगितले. तसेच मंदिराच्या टेरेसवरील मोठया प्रमाणात असलेला सिमेंट काँक्रीट व मातीच्या थराचीही पाहणी करून हा कोबा मंदिराच्या रचनेचा एक भाग बनला आहे. त्यामुळे याचा सखोल अभ्यास करुन दुरुस्ती करणे योग्य होईल असेही मत वाहणे यांनी नमूद केले आहे.

मणिकर्णिका कुंडाच्या उत्खननाचीही पाहणी करण्यात आली. यावेळी सिनिअर मॉडयुलर केंद्रीय पुरातत्व विभाग सुधीर वाघ,कोल्हापूर विभागाचे उत्तम कांबळे,पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्य शिवाजी जाधव,सचिव विजय पोवार, आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या