मंदिराच्या आवारात अनधिकृत लाडू विक्री केंद्र सुरू केल्याप्रकरणी त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळावर गुन्हा दाखल करावा, असे पत्र पुरातत्व खात्याच्या संरक्षण सहाय्यकांनी त्र्यंबकेश्वर पोलिसांना दिले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आवारात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 30 मार्च रोजी विश्वस्त मंडळाने लाडू विक्री केंद्र सुरू केले. प्रसाद म्हणून दोन लाडूंसाठी 20 रुपये घेण्यात येत आहेत. हे केंद्र बेकायदेशीरपणे सुरू करण्यात आले असून, ते बंद करण्यात यावे, अशी तक्रार माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी पुरातत्त्व विभागाकडे केली होती. यानंतर या विभागाने विश्वस्त मंडळाला व मंदिर प्रशासनाला हे केंद्र बंद करण्यासाठी नोटीस बजावली होती. तरीही विक्री सुरूच राहिल्याने पुरातत्त्व खात्याने कारवाईसाठी पाऊल उचलले आहे. संरक्षण सहाय्यकांनी सोमवारी, 5 मे रोजी त्र्यंबकेश्वर पोलिसांना गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पत्र दिले. लाडू विक्रीमुळे संरक्षित स्मारक नियमांचे उल्लंघन झाले आहे, यामुळे विश्वस्त मंडळावर गुन्हा दाखल करण्यात यावा, असे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. याप्रकरणी तक्रार देण्यासाठी पुरातत्वचे अधिकारी व कर्मचारी दोन दिवसांपासून त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात फेऱया मारत आहेत. निरीक्षकांची भेट होत नसल्याने तक्रारीची नोंद होत नाही, शेवटी संरक्षण सहाय्यकांनी निरीक्षकांना लेखी पत्र दिले आहे. दरम्यान, उद्या पुन्हा पुरातत्व खात्याचे अधिकारी, कर्मचारी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जाणार आहेत.
लाडू प्रसाद मोफत द्या – ललिता शिंदे
देवस्थानला कोटय़वधींचे वार्षिक उत्पन्न आहे. आर्थिक परिस्थिती चांगली असल्यामुळे व्यावसायिक स्वरूप न देता भाविकांना देवस्थानने लाडू प्रसाद मोफत देण्याचा निर्णय घ्यावा, त्याला आपला पाठिंबा राहील, असे माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी सांगितले.