सांगली – स्थापत्य अभियांत्रिकी सहायकाला 13 हजार घेताना अटक

प्रातिनिधिक फोटो

‘प्रधानमंत्री आवास योजने’तील मंजूर हप्ते जमा करण्यासाठी 13 हजार रुपयांची लाच घेताना कवठेमहांकाळ पंचायत समितीच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहायकाला रंगेहाथ पकडण्यात आले. सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज ही कारवाई केली. त्याच्याविरोधात कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमित मुबारक मुल्ला (वय 47, रा. शासकीय निवासस्थान, नगरपंचायत चौक कवठेमहांकाळ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तक्रारदारांच्या वडिलांच्या नावे प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल बांधकाम करण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. त्या निधीमधील तिसरा व चौथा हप्ता जमा करण्यासाठी मुल्ला यांनी तक्रारदाराकडे 20 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. आज दुपारी कवठेमहांकाळ येथील म्हसोबा गेट येथे सापळा लावला होता. त्यावेळी मुल्ला यांनी तक्रारदाराकडून 13 हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. पोलीस उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अजित पाटील, प्रीतम चौगुले, ऋषिकेश बडणीकर, पोपट पाटील, सुदर्शन पाटील, रवींद्र धुमाळ, चंद्रकांत जाधव, सीमा माने, उमेश जाधव, चालक वंटमुरे यांनी ही कारवाई केली.