भाड्याने घर देताय तर सावधान.. कारण भाडोत्र्यानेच हातोड्याचे घाव घालून वाड्यातील नेहरोली परिसरात राहणारे राठोड कुटुंब संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राठोड कुटुंबीयांनी आरिफ अन्सारी याला आपले घर राहण्यासाठी भाड्याने दिले होते. आरिफने चोरीच्या उद्देशाने कुटुंबातील तिघांची हत्या केली आणि पोबारा केला. मात्र त्याला चोरी पचली नाही आणि वाडा पोलिसांनी आरिफ अन्सारीला उत्तर प्रदेशमधील प्रयागराज मिर्जा येथून अटक केली. फर्निचरच्या दुकानात काम करणारा आरिफ अन्सारी हा नेहरोली येथील बोंद्रे आळीत राहणाऱ्या राठोड कुटुंबीयांकडे भाड्याने राहत होता. मात्र झटपट पैसे कमावण्याच्या उद्देशाने त्याने घरमालकाच्याच घरात चोरी करण्याचे ठरवले. 17 ऑगस्ट रोजी तो चोरीच्या उद्देशाने घरात घुसला आणि त्याने घरमालक मुकुंद राठोड (70), त्यांची पत्नी कांचन राठोड (69) व मुलगी संगीता राठोड (51) या तिघांच्या डोक्यात हातोड्याचे घाव घालून निर्दयी हत्या केली. या तिहेरी हत्याकांडानंतर तो उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मिर्जा येथे मूळ गावी पळून गेला. त्याने पुरावे नष्ट करण्यासाठी कांचन राठोड व संगीता राठोड यांचे मृतदेह लोखंडी पेटीत लपवले, तर मुकुंद यांचा मृतदेह बाथरूममध्ये कपड्याने झाकून ठेवला होता.
पोलिसांच्या भीतीने लपून बसला
तिहेरी हत्याकांडाची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. यावेळी भाडोत्री गायब असल्याने त्यांचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आणि ते उत्तर प्रदेशात पोहोचले. पोलीस पकडतील या भीतीने आरिफ गावाबाहेर लपून बसला होता. मात्र वाडा पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने त्याच्या मुसक्या आवळल्या.