ठसा – न्या. भूषण धर्माधिकारी

2267

>> प्रतीक राजूरकर

मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश भूषण धर्माधिकारी 27 एप्रिल रोजी निवृत्त झाले. मुख्य न्यायाधीश म्हणून आपल्या कारकीर्दीतील अखेरच्या दिवसाचे कामकाज करण्यासाठी त्यांनी नागपूर खंडपीठाची निवड केली. कोरोनामुळे न्या. धर्माधिकारी यांचा कुठल्याही प्रकारचा जाहीर निरोप समारंभ होऊ शकला नाही. मूळचे नागपूरचे असलेले न्या. धर्माधिकारी यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्तीपदी मार्च 2004 मध्ये नियुक्ती झाली होती. सहसा कुठल्याही उच्च न्यायालयात त्या राज्याचे न्यायमूर्ती मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त होत नाहीत. मात्र न्या. भूषण धर्माधिकारी त्याला अपवाद ठरले. आपल्याच राज्यात मुख्य न्यायाधीश होण्याचा मान काही प्रशासकीय निकषांमुळे फार कमी न्यायाधीशांना प्राप्त होतो. 24 फेब्रुवारी 2020 रोजी न्या. धर्माधिकारी यांची प्रभारी मुख्य न्यायाधीशपदी, तर 20 मार्च रोजी मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. तत्पूर्वी 1980 मध्ये धर्माधिकारी यांनी नागपूरला वकिली व्यवसायास सुरूवात केली. 24 वर्षे त्यांनी स्थानिक पातळीवरील अधिकारी, प्राधिकरण, कामगार व औद्योगिक न्यायालय, जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालयात वकिली करताना लक्षणीय यश प्राप्त केले होते. त्यांच्या कामाचा वेग आणि आवाका विधी वर्तुळात कायम चर्चेचा विषय होता. न्यायालयीन वेळ सुरू होण्यापासून ती संपेपर्यत धर्माधिकारी पूर्ण वेळ न्यायालयात हजर असत. अनेक कनि… सहकारी हाताखाली असूनही त्यांचे लहान-मोठय़ा सर्व प्रकारच्या कामावर जातीने लक्ष असायचे. वकिली व्यवसायातील त्यांची शिस्त त्यांच्या वकील सहकाऱयांनी अनुभवली. पुढे न्यायाधीश झाल्यावर त्याच शिस्तीचा अनुभव विधी वर्तुळातील सर्वांनाच आला. नागपूर खंडपीठात न्यायाधीश म्हणून कार्यरत असताना सकाळी साडेदहाची न्यायालयात हजर होण्याची न्या. धर्माधिकारींची वेळ कधीच चुकली नाही. वकिलांनी तत्काळ सुनावणी करण्याची विनंतीसुध्दा न्या. धर्माधिकारींनी कधी अव्हेरल्याचे कोणाच्या स्मरणात नाही. अनेकदा वकिलांच्या सहमतीने न्यायालयीन वेळेनंतरदेखील प्रकरणाचे महत्व लक्षात घेत न्या. धर्माधिकारी सुनावणी घ्यायचे. त्या कारणास्तव वकील मंडळींना न्यायलयासमक्ष प्रकरण लावून धरण्यात सुलभता व्हायची. कौटुंबिक कार्यक्रम नेहमीच सुट्टीच्या दिवशी व्हावेत असा न्या. धर्माधिकारींचा आपल्या कुटुंबाला आग्रह असायचा. 2010- 11 मध्ये न्या. धर्माधिकारी यांचा लहानसा अपघात झाल्याने हाताला फ्रॅक्चर असूनही ते कामावर हजर होते. न्यायालयीन प्रकरणांचा बोजा कमी व्हावा यासाठी त्यांनी प्रसंगी कामकाजाची वेळ न बघता वेळेत न्यायदानाचे कार्य केले. सेवाज्ये…तानुसार पहिल्या पाच न्यायाधीशांत समावेश झाल्यावर न्या. धर्माधिकारी यांचे मुंबईला स्थलांतर झाले. मुंबई उच्च न्यायालयात 1947 व 1960 सालची प्रलंबित प्रकरणे त्यांनी निकाली काढली. मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाल्यावर कोरोनामुळे अगोदर सुरू झालेली व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्रणाली मोठय़ा प्रमाणात अंमलात आणत प्रकरणांची सुनावणी अधिक लोकाभिमुख केली. त्यामुळे वकीलांना ई -फाईलींगच्या माध्यमातून प्रकरणे दाखल करून सुनावणी घेता आली. मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यभार स्वीकारल्यावर मुंबई, नागपूर, संभाजीनगर, पणजी येथील न्यायालयात 60 हजारांहून अधिक दिवाणी व फौजदारी प्रकरणे निकाली निघाली असल्याचे प्रकाशित आहे. प्रभारी व मुख्य न्यायाधीश म्हणून न्या. धर्माधिकारी यांना त्याचा खूप कालावधी मिळाला नाही. मात्र मिळालेल्या अल्पकाळात अधिकाधिक प्रकरणे निकाली काढण्याचे मोठे कार्य त्यांच्या कार्यकाळात झाले. जुन्या प्रलंबित प्रकरणांसाठी न्यायालयीन कामकाजाचा अर्धा वेळ राखीव असावा असे न्या. धर्माधिकारींचे ठाम मत होते व आहे.

वास्तविक, निवृत्तीनंतरदेखील काहीकाळ मुख्य न्यायाधीशांना आपले न्यायालयीन निवासस्थान वापरता येते. तथापि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियोजित मुख्य न्यायाधीशांना विश्रामगृहात वास्तव्य करावे लागू नये म्हणून न्या. धर्माधिकारी व त्यांच्या पत्नी यांनी आपले न्यायालयीन निवासस्थान निवृत्तीपूर्वीच रिकामे केले आणि प्रशासनाला सुपूर्द केले. आपल्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायधीश पदाला साजेशी कृती त्यांनी केली आणि एक वेगळा आदर्श घालून दिला. आधी वकिली आणि नंतर न्यायाधीश या नात्याने काम करताना न्या. धर्माधिकारी यांनी त्यांचे कामाप्रती असलेले समर्पण, निष्ठा आणि तळमळ शेवटपर्यंत कायम ठेवली. आज ते निवृत्त झाले असले तरी त्यांच्या या आदर्शाची चर्चा आजही विधी वर्तुळात होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या