एकाकडून गुंतवणूक घ्यायची आणि दुसऱ्याला परतावा द्यायचा. अशी याची टोपी त्याला आणि त्याची टोपी याला, असा प्रकार आरजू टेकसोल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये सुरु होता. आरजू कंपनीने तब्बल 140 कर्मचारी कामावर ठेवले होते. त्यापैकी पोलीसांनी 30 कर्मचाऱ्यांचे जबाब घेतले आहेत. आतापर्यंत 475 गुंतवणूकदारांचे जबाब घेतले असून त्यांनी 5 कोटी 39 लाख 57 हजार 455 रुपये गुंतवले असल्याची माहिती पुढे आली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या या रत्नागिरी मतदार संघात ही घटना घडली आहे. उद्योगमंत्र्यांच्या मतदार संघात नवीन उद्योग येईल अशा आशेवर रत्नागिरीकर असताना काही वर्षांपुर्वी सुरु झालेल्या या उद्योगाने रत्नागिरीकरांना 5 कोटींचा चूना लावला आहे.
रत्नागिरी एमआयडीसीमध्ये आरजू टेकसोल कंपनी स्थापन करून कच्चा माल देतो, पक्का माल तयार करून द्या अशी जाहिरात करत या कंपनीने असंख्य लोकांची फसवणूक केली. कच्चा माल देतो, पक्का माल करून द्या असे सांगताना या कंपनीने गुंतवणूक गोळा करायला सुरुवात केली. त्यावर परतावा देण्याचे आश्वासन दिले. परताव्याच्या आमिषाला अनेकजण बळी पडले. आतापर्यंत पोलीसांनी475 गुंतवणूकदारांचे जबाब घेतले आहेत. या गुंतवणूकदारांनी तब्बल 5 कोटी 39 लाख 57 हजार 455 रुपयांची गुंतवणूक केली आहे. अजूनही काही गुंतवणूकदार आहेत, ते अजून पोलीसांपर्यंत पोहोचलेले नाहीत. आरजू टेकसोलने आपले कार्यक्षेत्र सिंधुदुर्ग, सांगली आणि दिल्लीपर्यंत वाढवले होते. सिंधुदुर्गमध्येही मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याची शक्यता आहे. आरजू टेकसोल प्रायव्हेट लिमिटेडने तब्बल140 कर्मचाऱ्यांना कामावर ठेवले होते. त्यापैकी 30 कर्मचाऱ्यांचा पोलीसांनी जबाब घेतला आहे. पुढील काही दिवसांत अन्य काही कर्मचाऱ्यांचा जबाब घेतला जाणार आहे. शेवटचे काही महिने कर्मचाऱ्यांचा पगार न झाल्याची माहिती पुढे येत आहे.