संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. अमेरिकेसोबत झालेल्या करारानुसार हिंदुस्थानने अमेरिकेकडून 73 हजार सिग सॉअर असॉल्ट रायफलसाठी दुसरी ऑर्डर दिली. यासाठी हिंदुस्थान 837 कोटी रुपये अमेरिकेला मोजणार आहे. याआधी फेब्रुवारी 2019 मध्ये हिंदुस्थानने 647 कोटी रुपये किमतीच्या 72 हजार 400 एसआयजी 716 या रायफल्सची ऑर्डर दिली होती. रायफल्सच्या दुसऱया खरेदीला राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखालील संरक्षण संपादन परिषदेने डिसेंबर 2023 मध्ये मान्यता दिली होती. या दोन्ही करारांनंतर हिंदुस्थानी सैन्याकडे 1.45 लाख सिग सॉअर असॉल्ट आणि 716 असॉल्ट रायफल्स असतील. रायफलची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी हिंदुस्थानने रशियाकडून एके-203 कलाश्निकोव्ह रायफल मागवल्या होत्या. परंतु ही ऑर्डर मिळण्यास उशीर झाल्यामुळे हिंदुस्थानने फेब्रुवारी 2019 मध्ये अमेरिकन फर्म सिग सोहसोबत रायफलचा करार केला होता.
– या रायफलचे चार व्हेरियंट आहेत. पहिले व्हेरियंट सिग 716 सीक्यूबी आहे. ही रायफल जवळच्या लढाईसाठी बनवली आहे. याचा आकार छोटा असतो, परंतु लक्ष्य जबरदस्त आहे. ही रायफल कार्बाइन फॉर्मेटमध्ये आहे. सिग-716 प्रेसिशन मार्क्समॅन व्हेरियंट भारी असते. हे सेमी-ऑटोमॅटिक फॉर्मेटमध्ये येते. आणखी एक व्हेरियंट सिग-716 पेट्रोल रायफल आहे.
दर मिनिटाला 685 राऊंड फायरिंग
सिग-716 रायफलची शक्ती जबरदस्त आहे. ही ऑटोमॅटिक असॉल्ट रायफल आहे. याची ऍक्युरेसी 100 टक्के आहे. शत्रूला धडकी भरण्याची पॉवर या रायफलमध्ये आहे. या रायफलने दर मिनिटाला 685 राऊंड फायरिंग केल्या जाऊ शकतात. याच्या एका मॅगजीनमध्ये 20 गोळ्या लावल्या जाऊ शकतात. यात नाटो ग्रेडच्या गोळ्यांचा वापर केला जाऊ शकतो. याची रेंज 600 मीटर आहे. जी एके-47 पेक्षाही जास्त आहे.
– 72,400 रायफल्सच्या पहिल्या ऑर्डरपैकी 66,400 रायफल्स लष्कराला, 4 हजार हवाई दलाला आणि 2 हजार नौदलाला देण्यात आल्या. चीन आणि पाकिस्तान सीमेवर तैनात असलेल्या जवानांना या रायफल्स दिल्या जात आहेत. हिंदुस्थान अमेठी येथील इंडो-रशिया रायफल्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये रशियाच्या मदतीने एके-203 कलाश्निकोव्ह रायफल्सची निर्मिती करत आहे.