अखेर बरसला; चंद्रपूरात पावसाचे आगमन, नागरिकांना दिलासा

राज्यातील बऱ्याच भागांमध्ये पावसाचे आगमन झाले आहे. मात्र चंद्रपूरकर पावसाच्या प्रतिक्षेत होते. अखेर आज त्यांची प्रतिक्षा संपली असून उष्णतेच्या तिव्रतेत भाजून निघालेल्या चंद्रपूरकरांना पावसाने दिलासा दिला आहे.

‘अखेर चंद्रपुरात पाऊस बरसला’ अशीच भावना आज प्रत्येक चंद्रपूरकराच्या मनात होती. तीव्र उन्हाळ्याने पोळून निघालेल्या चंद्रपूरकरांना रात्री पडलेल्या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. मान्सून केव्हा बरसणार, या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना आज पावसाने चिंब केले. मागील चार महिन्यांपासून घामाच्या धारांमध्ये वावरणारे चंद्रपूरकर आज पावसाच्या सरींनी भिजले. मेघगर्जनेसह आठ वाजता पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या या पावसामुळे रस्त्यावरील नागरिकांची त्रेधा उडवली. मिळेल त्या आडोशाला उभे राहत पावसापासून बचाव करताना लोक दिसत होते. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून काहीलीपासून सुटका झाल्याने इथले नागरिक सुखावले आहेत.