
प्रख्यात चित्रकार प्रभाकर बरवे यांच्यावरील ‘बरवे संचित’ आणि चित्रकार सतीश नाईक यांनी लिहिलेल्या ‘गेले द्यायचे राहून’ या पुस्तकांचे प्रकाशन बुधवार, 8 एप्रिल रोजी रात्री 8ः30 वाजता नामवंत चित्रकार अतुल डोडिया यांच्या हस्ते प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़ मंदिरात होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱया या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार दिनकर गांगल, डॉ. मीनाक्षी पाटील, रवींद्र जोशी आणि सतीश नाईक उपस्थित राहणार आहेत.
प्रकाशन सोहळ्याची सुरुवात सायंकाळी 5ः15 वाजता होणार असून रवींद्र नाटय़ मंदिराच्या मिनी थिएटरमध्ये ‘बरवेंची पानं’ हा दृकश्राव्य नाटय़ानुभव देणारा अभिवाचनाचा कार्यक्रम होईल. याशिवाय प्रभाकर बरवे यांच्या कवितांचं, तर कवी आणि चित्रकार नितीन दादरावाला यांच्या बरवे यांच्यावरील कवितांचं सादरीकरण होईल.
आगळावेगळा रंगमंचीय आविष्कार
चित्रकार आशुतोष आपटे हे ‘कोरा कॅनव्हास’ या पुस्तकावर आधारित रंगमंचीय आविष्कार सादर करतील. बरवे यांची पेंटिग्ज, रेखाटने, लेखन यांचा वापर करून मांडणी शिल्प आणि सादरीकरणाचा हा अभिनव प्रयोग असेल. अशा प्रकारचा हा पहिलाच रंगमंचीय आविष्कार ठरणार आहे.






























































