कला आणि साहित्य, दिवाळीचा ‘प्रकाश’

>> डॉ. प्रतिमा जगताप

दिवाळी म्हणजे जीवन उजळून टाकणारा प्रकाश. दिवाळी म्हणजे दिव्यांच्या ओळी. अर्थात हा प्रकाश फक्त दिव्यांचा नसतो तर मराठमोळय़ा कला, साहित्य आणि संस्कृतीचाही असतो. संतांनी लिहिलेले अभंग असोत किंवा अलीकडच्या कवींनी केलेल्या कविता, नाटय़गीत असो की चित्रपटगीत या सर्वांमध्ये दिवाळीचे प्रतिबिंब दिसते. किंबहुना हादेखील एकप्रकारे दिवाळीचा स्वादिष्ट फराळच. पहाटवेळेला ऐकू येणारी मंदिरातील काकड आरती असो, टाळ-मृदुंगाच्या तालावर म्हटलेली भजनं असोत, ती ऐकली की दिवाळी फक्त दिव्यांच्या ओळींपुरती राहातच नाही. ती आपल्या कानामनात अवघ्या जीवनात सुमधुर गाणं होऊन येते.

जोमयी प्रकाश घेऊन दिवाळी येते. हा प्रकाश फक्त दिव्यांचा नसतो. तर कला, साहित्य, संस्कृतीचाही असतो. जो जनजीवनाला, मानवी भावभावनांना प्रतिबिंबित करणारा असतो. हा मंगलदायी दीप कितीतरी कवितांमधून, अभंगांमधून आणि सुमधुर गाण्यांमधून आपल्याला सुखवीत असतो. लौकिक अर्थाने हा दिव्याचा प्रकाश अंधाराचा नाश करतो. पण मनातील अंधकार दूर करण्यासाठी संतांनी लिहिलेले अभंग असोत की आधुनिक ज्येष्ठ कवींनी रचलेल्या कविता असोत…आपल्या मनाचा गाभारा उजळून टाकतात. मंगलदायी दिवाळीची चाहूल या अविस्मरणीय रचना आपल्याला देत असतात. आपण सज्ज होतो दिवाळीचं स्वागत करण्यासाठी. स्वागतासाठी पहाटवेळेला ऐकू येणारी मंदिरातील काकड आरती असो, टाळ-मृदुंगाच्या तालावर म्हटलेली भजनं असोत, ती ऐकली की दिवाळी फक्त दिव्यांच्या ओळींपुरती राहातच नाही. ती आपल्या कानामनात अवघ्या जीवनात सुमधुर गाणं होऊन येते.

‘तिमिरातून तेजाकडे, ने दीपदेवा जीवना’ ही कुसुमाग्रजांच्या शब्दांमधील प्रार्थना असो की ‘अंतरिचा दिवा मालवू नको रे…’ असं कळकळीने सांगणारे संत सोहिरोबा असोत, या काव्यरचना, सुमधुर गाणी दिवाळीच्या आनंदप्रकाशाकडे आपल्याला घेऊन जातात. दिवाळीच्या अनेक विविधरंगी भावभावनांनी नटलेल्या गाण्यांपैकी एक गाण धनत्रयोदशीच्या दिवशी हमखास आठवतं ते म्हणजे-

लाविते मी निरांजन,
तुळशीच्या पायापाशी ।
भाग्य घेउनिया आली,
आज धनत्रयोदशी ।।

विदुषी माणिक वर्मा यांच्या सोज्वळ सुरांमधून हे गीत ऐकलं की खऱया अर्थानं दिवाळी साजरी झाल्यासारखी वाटते. मराठी माणसाला दिवाळीच्या फराळाबरोबर दिवाळी अंकांची जशी गोडी असते तशीच मराठी नाटकांचीही. माणिकताईंच हे गाणं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा मनःचक्षूंपुढं ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’मधील ताई साक्षात उभी राहाते. सुंदर, सुबक तुळशीवृंदावन आणि निरांजन लावणारी ताई…ज्योतीचा प्रकाश तिच्या चेहऱयावर उजळलेला आणि धनत्रयोदशीचा सण भाग्य घेऊन आलेला… तुळशीपुढं दिवा लावताना माणिकताईंचा स्वर कानाला सुखावत असतो.

संतसाहित्याचे गाढे अभ्यासक यशवंत पाठक यांच्या लेखातल्या काही ओळी आवर्जून आठवतात. किती सुंदर लिहिलंय बघा पाठकसरांनी, ‘‘पणती तुळशी वृंदावनापाशी लावली की सासुरवास उजळतो नि तो अनेक साठा उत्तरांच्या कहाण्या सुफळ संपूर्ण करतो. तुळस हीच सासुरवाशीणीची प्रिय सखी असते. तिच्यापाशी मन मोकळं करून ती पुन्हा सासुरवास झेलायला ताजीतवानी होते. माहेरवाशीण तुळशीपाशी बसली की बालपणाच्या आठवणी तिच्या पापण्यांच्या अंगणात उडायला लागतात. ती त्या अधीरपणे गोळा करू पाहते.’’

आली दिवाळी दिवाळी, पहाटेच्या त्या आंघोळी । घरोघरी जागविते, माय मुले झोपलेली ।।
घरोघरी दीप ज्योती, वरसाचा मोठा सण । क्षणोक्षणी होते, आई तुझी आठवण ।।

दिवाळी आल्यावर बालपणीच्या आठवणी येतातच. बाळ कोल्हटकरांनी लिहिलेल्या या ओव्या स्त्राrमनावर कोरल्या गेल्या आहेत. मूळ नाटकात आशा काळे या ओव्या स्वतः गात. पुढे माणिक वर्मा यांच्या आवाजात ध्वनिमुद्रिका निघाली. ही ध्वनिमुद्रिका आकाशवाणीच्या सांगीतिक वाटचालीतील ‘मर्मबंधातली ठेव’ आहे. कित्येक पिढय़ा या  स्वरलहरींवर डोलत राहिल्या. स्त्रीमनाची हळवी स्पंदनं बाळ कोल्हटकर यांनी या ओवीबद्ध कवितेतून व्यक्त केली. पुढे ती स्वरबद्ध करून माणिकताईंच्या गोड गळ्यातून घराघरात पोहोचवली.

चार वरसांमागे होता, हात तुझा अंगावरी । कधी नाही जाणवली, हिवाळ्याची शिरशिरी ।।
आज झोंबतो अंगाला, पहाटेचा थंड वारा । कुठे मिळेल का आई, तुझ्या मायेचा उबारा ।।

दिवाळी आलीय, दरवर्षीप्रमाणे येणार…पण आता आई नसणार… तिचा मायेचा ऊबदार हात आता अंगावर फिरणार नाही. आता हिवाळ्याची गोड शिरशिरी नाही, तर फक्त आठवणींच्या सरी, डोळ्यातून वाहणाऱया…

तुझ्याविना आई घर सुनेसुनेसे वाटते । आणि दिवाळीच्या दिशी तुझी आठवण येते ।।
सासरीच्या या संसारी माहेराची आठवण । आठवती बाबा भाऊ आणि दारीचे अंगण ।।
अंगणात पारिजात कोण देई त्याला पाणी । दारी घालिते रांगोळी, माझ्यावाचून का कोणी ।।

अशी आठवणींची रांगोळी घेऊन येते ही कविता. आई नाही या कल्पनेनं शहारते, पण बाळपणींच्या दिवाळीच्या आठवणींनी मोहरतेसुद्धा! ऐन दिवाळीत माणिकताईंसारखी स्वरलक्ष्मी हा इहलोक सोडून गेली. त्या वेळी दिवाळीतल्या दिव्यांमधला प्रकाश क्षीण झाल्याचा अनुभव आपण घेतला होता. पण आता हा प्रकाश पुन्हा नव्या उमेदीनं उजळत ठेवलाय तो त्यांच्या अजरामर स्वरांनी! बाळ कोल्हटकर यांच्या शब्द-स्वरांच्या सामर्थ्यानी!

दिवाळी म्हणजे अंधाराचा नाश आणि प्रकाशाची पूजा. संतांचं जीवनकार्य आणि शिकवण आपलं जीवन उजळवून टाकणारा प्रकाश! संतांच्या जीवनावरचे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. त्यातील गदिमांनी लिहिलेलं एक गाणं संतवाङ्मयाशी नातं जोडणारं.

नवल वर्तले गे माये, उजळला प्रकाशु
मनाचिये अंधाराचा, होतसे विनाशु

अशी गदिमांची कविता ‘उजेडी राहिले उजेड होउैन’ असं म्हणत रसिकांना खऱयाखुऱया दिवाळीचा लख्ख प्रकाश दाखवते. मराठमोळ्या साहित्यसंस्कृतीमध्ये अभंग, कविता, नाटय़गीतं, चित्रपटगीतं म्हणजे दिवाळीचा स्वादिष्ट फराळ. जो वर्षानुवर्षे दर दिवाळीत आपल्याला हवाच हवा.

दिवाळी म्हणजे दिव्यांच्या ओळी…दिवे किती…अंगणात, मनामनात आणि देव्हाऱयातील मंद ज्योतीनिशी तेवणाऱया निरांजनाच्या रूपात. सत्त्वशील मनाला आश्वस्त करणारे ज्ञानेश्वर माऊली इवल्याशा दीपकलिकेची महती या शब्दांमध्ये सांगतात-

जैसी दीपकलिका धाकुटी । परि बहु तेजाने प्रकटी।।’’

अशी बहुतेजाने प्रकाशणारी दिवाळी सर्वांच्याच जीवनामध्ये येवो या हार्दिक शुभेच्छा देऊया आणि कवी प्रवीण दवणे यांच्या ओळी गुणगुणत राहूया-

सृष्टीचा देव्हारा, दरवळला गाभारा
सर्व दिशा कांचनमय, पवनमंद मंगलमय
आरतीत तेजाच्या विश्व दंग हे
तेजोमय नादब्रह्म हे…

(लेखिका पुणे आकाशवाणी केंद्राच्या निवृत्त उद्घोषिका आणि लेखिका आहेत.)

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या