जमावबंदीचे आदेश असतानाही मशिदीमध्ये गर्दी, 30 नागरिकांविरुद्ध गुन्हा दाखल

3867

केंद्र, राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाकडून वारंवार सूचना व आवाहन करुनही संगमनेरातील काही बेजबाबदार नागरिकांकडून कायद्याचा भंग केला जात आहे. या कृतीमुळे पोलिसांनी आता आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली असून नाटकी परिसरातील इस्लामपूरा मशिदीत बंदीहुकूम मोडून सामूहिक नमाज पठण करणार्‍या 30 जणांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या सर्वांवर भारतीय दंड संहिता, मुंबई पोलीस अधिननियम, साथरोग प्रतिबंधक कायद्यासह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या कलमांन्वये शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी ठिकठिकाणच्या जिल्हाधिकार्‍यांनी आपापल्या जिल्ह्यातील सद्यस्थितीनुसार टप्प्याटप्प्याने प्रतिबंधात्मक आदेश बजावले आहेत. त्यानुसार गेल्या 20 मार्चपासून नगर जिल्ह्यातील सर्व धर्माची प्रार्थना स्थळे पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यास सांगण्यात आली आहेत. त्यानुसार संगमनेरातील विविध मंदिरे, मशिदी, चर्च व गुरुद्वारे सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आली आहेत. असे असतांनाही काही बेजबाबदार नागरिकांकडून प्रशासनाने वारंवार सांगूनही जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन केले जात आहे. सुरुवातीला प्रेमाने व नंतर कठोरपणे सांगूनही असे काही त्याला दाद देत नसल्याने अखेर पोलिसांनी कायदेशीर कारवाईचा अंतिम मार्ग वापरण्यास सुरुवात केली आहे.

नाटकीनाला परिसरात असलेल्या इस्लामपूरा मशिदीत मोठ्या संख्येने काही नागरिक जमा झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक अभय परमार यांना समजली. त्यानुसार त्यांनी पोलीस उपनिरीक्षक माधव केदारे, संजय कवडे, सहाय्यक फौजदार बाळासाहेब यादव, बाळासाहेब पारधी, राजू गायकवाड, शिवाजी डमाळे, सचिन सोनवणे यांच्यासह मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी छापा घातला असता त्या मशिदीत मोठ्या संख्येने नागरिक गोळा झाल्याचे त्यांना दिसले. विशेष म्हणजे ज्या मौलानाच्या आवाहनावरुन सर्वसामान्य भाबडी माणसं तेथे जमा झाली होती, तो मौलाना मात्र पोलिसांची कुणकूण लागताच पसार झाला. यावेळी पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले.

सहाय्यक फौजदार बाळासाहेब यादव यांनी या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सलमान अब्दुल शेख (वय 35, रा.इस्लामपूरा), माजीद हरुन शेख (वय 33, रा.नायकवाडपूरा), आजीमखान नासिरखान पठाण (वय 38, रा.रहेमतनगर), निजामुद्दीन फकीरमोहंमद तांबोळी (वय 59, रा.करुले, ता.संगमनेर), चाँद अब्बास (वय 65, रा.मेंढवण, ता.संगमनेर) व शोएब शाबीर खतीन (वय 22, रा.सुकेवाडी रोड) यांना ताब्यात घेत अटक केली. नंतर त्यांची जामिनावर सुटकाही करण्यात आली. यावेळी गर्दीचा फायदा घेत त्या मशिदीचा मौलाना अकील शकीर काकर याच्यासह सलिम मिश्री व अलका फ्रुट नामक दुकानाचा चालक (नाव माहिती नाही) यांच्यावर जिल्हाधिकार्‍यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करण्यासह लॉकडाऊन असताना बेकायदा जमाव गोळा करणे, हयगय व उपद्रव करुन मानवी जीवन धोक्यात येईल असे कृत्य करणे, महामारीचा संसर्ग होण्याची शक्यता माहिती असतानाही शासनाच्या आदेशाचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या सर्वांवर भारतीय दंड संहितेचे कलम 188, 269, 270, 271, 290 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1)(3) चे उल्लंघन केल्याने 135 प्रमाणे, साथरोग प्रतिबंधक अधिनियम 1897 चे कलम 2, 3, 4 सह महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना नियम 220 चे कलम 51 ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

…तर हद्दपार करण्यात येईल
संंगमनेरकर नागरिक सुजान आहेत. प्रशासनाच्यावतीने आम्ही वारंवार शहरातील सर्व समाजाच्या प्रार्थनास्थळांच्या व्यवस्थापकांची बैठक बोलावली आहे. त्यातून त्यांना करोना रोगाबाबतची संपूर्ण माहिती, शासनाकडून सुरु असलेल्या उपाययोजना आणि प्रार्थनास्थळांचे प्रतिनिधी म्हणून त्यांची भूमिका याबाबत लेखी व तोंडी सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत सामूहिक उपासना बंद करण्याचे सक्त आदेश दिलेले आहेत. असे असतांनाही काहीजण नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करीत आहेत. असे प्रकार कोणत्याही स्थितीत खपवून घेणार नाही, यानंतरही असा प्रकार निदर्शनास आल्यास याहून अधिक कठोर कारवाई करण्यात येईल. प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाय योजना करीत आहे, त्याला साथ द्या. सामूहिकपणे प्रयत्न केल्यासच या महामारीला हद्दपार करता येईल, असे संगमनेर शहर पोलीस निरीक्षक अभय परमार म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या