मोदी सरकारच्या निर्णयांचे स्वागत, समान नागरी कायदा झाला पाहिजे! उद्धव ठाकरे यांची खणखणीत भूमिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
uddhav-thackeray-interview

सामना ऑनलाईन । मुंबई

‘देशहिताच्या आड धर्म येऊ देऊ नका हा महत्वाचा विषय शिवसेनाप्रमुखांनी वारंवार मांडला होता. मला असे वाटते की हे सरकार आपल्याला त्याच दिशेने नेत आहे. म्हणून आम्ही या गोष्टींचे स्वागत करतो. समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे. ते आमच्या वचननाम्यातील वचन आहे’, अशी खणखणीत भूमिका मांडत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या निर्णयाचे जोरदार स्वागत केले. ‘मातोश्री’ येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सरकारचे कौतुक केले.

‘देश एक आहे म्हटल्यावर सगळ्या गोष्टी एकच असल्या पाहिजेत. भाषावार प्रांतरचना झाली आहे ती लक्षात घेतल्यानंतर त्या त्या भाषेचे, त्या त्या प्रांतामध्ये महत्व ठेवून संपूर्ण देश म्हणून आपण पुढे जाऊ शकतो हे आपण दाखवून दिले आहे. राज्याला जो वेगळा कायदा होता तो काढला, हे महत्वाचे पाऊल आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

समान नागरी कायद्याचे 70 टक्के काम झाले- संजय राऊत

तसेच ‘जनसंख्या नियंत्रण व्हायला पाहिजे ही शिवसेनेची कायम मागणी राहिली आहे. ‘हम दो हमारे पच्चीस’ ही भूमिका याला सगळ्यात पहिले तोंड शिवसेनाप्रमुखांनी फोडले. तिहेरी तलाक विरोधी कायदा हा कायदा देखील या संदर्भात महत्वाचा ठरतो. सरकारचे निर्णय म्हणजे समान नागरी कायद्याच्या दिशेने उचलेली महत्वाची पाऊले आहेत, अशी भूमिका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी मांडली.

‘अशा प्रकारचा कायदा असावा हे धोरण शिवसेनेचे सातत्याने राहिले आहे. एनडीए सरकारमध्ये शिवसेनेने स्वीकारलेल्या भूमिका हे मोदी सरकार पुढे नेत आहे. या राष्ट्रहिताच्या भूमिका आहेत. समान नागरी कायद्यासाठी टाकलेली ही महत्वाची पावले आहेत. 370 कायदा काढणे हे एक निशाण, एक कायदा एक विधान, हे अत्यंत महत्वाचे पाऊल आहे. समान नागरी कायदा जो भविष्यात येऊ इच्छितो त्यातले 70 टक्के काम या दोन कायद्यांना अधिकृतरित्या मान्यता दिल्याने झाल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले.

धनराज महाले यांचा शिवसेनेत प्रवेश

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणारे धनराज महाले हे पुन्हा शिवसेनेत आले. त्यांच्यासह त्यांचे समर्थक देखील शिवसेनेत परतले आहे. नाशिक जिल्ह्यात शिवसेना अधिक बळकट होताना दिसत आहे.