आपण प्रदुषणमुक्त कधी होऊ?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शैलेश माळोदे

डॉ. गुफरान बेग. मुंबई, पुणे, दिल्ली सारख्या शहरांत प्रदुषण हा मोठा प्रश्न प्रदुषणमुक्तीसाठी प्रयत्न करणारे हे पहिले शास्त्रज्ञ आहेत.

हिंदुस्थानमध्ये हवेची गुणवत्ता कशी आहे यासंबंधीचे संशोधन प्रयत्न डॉ. गुफरान उल्लाह बेग नावाच्या वैज्ञानिकाने सर्वप्रथम मोठय़ा प्रमाणात सुरू केले. देशातील सर्वप्रथम हवा गुणवत्ताविषयक अंदाज व्यक्त करणारी प्रणाली महानगरांसाठीं विकसित करण्याचं श्रेय डॉ. बेग यांना जातं. निमली (राज) इथे सेंटर फॉर सायन्स ऍण्ड एनव्हायरमेण्ट एका मीडिया परिषदेत त्यांच्याशी एक पूर्ण दिवस व्यतीत करण्याची संधी मिळाली.

24 मे 1961 रोजी जन्मलेले डॉ. गुफरान बेग आपले पुणेकरच आहेत. हिंदुस्थानी आणि देशीय हवामानशास्त्र संस्था, पुणे येथे कार्यरत असलेले डॉ. बेग ‘सफर’चे कार्यक्रम संचालक आहेत. हे एक हवा गुणवत्ता आणि हवामानविषयक निरीक्षण केंद्राचं एक नेटवर्क असून त्यांच्याद्वारे उत्सर्जनाविषयीची ‘इन्व्हेण्ट्री’ तयार करून राखली जाते. हरितगृह वायूच्या उत्सर्जनातील मानवजन्य सहभाग याविषयीचं त्यांचं संशोधन खूप गाजलं. लघुकालिक हवामान अंदाजामधील त्यांचं संशोधन विविध शास्त्राrय शोधनियतकालिकांतून प्रसिद्ध झालंय.

सुमारे 36 वर्षांचा संशोधनविषयक अनुभव आणि 18 वर्षांचा शिकवण्यातील अनुभव असलेले डॉ. बेग हे अत्यंत हसतमुख आणि अत्यंत खिलाडूवृत्तीचे म्हणून परिचित आहेत. सध्या देशातील मोठी महानगरं आणि शहरं वायुप्रदूषणामुळे गुदमरत आहेत. त्यांना एकप्रकारे गळफास लागलेला असून तो अधिकाधिक आवळला जातोय. म्हणून वायुप्रदूषणात विविध वायूंची नेमकी काय भूमिका आहे आणि टक्केवारी आहे हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे, असे आग्रही प्रतिपादन करीत डॉ. बेग आपलं काम प्रबोधन विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन जाण्यावर भर देतात.

2005 साली त्यांना जागतिक हवामान संघटनेद्वारे नॉबर्ट गेरबिअर एमयूएमएम आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. डॉ. बेग असा पुरस्कार मिळविणारे प्रथम हिंदुस्थानी होत. 2006 साली त्यांना सीएसआयआरतर्फे देण्यात येणाऱया डॉ. शांतीस्वरूप भटनगर पारितोषिक देण्यात आलं. 2007 साली त्यांना महाराजा उदयसिंग पुरस्कार, तर 1999 साली पदार्थविज्ञानानील तरुण मुस्लिम शास्त्रज्ञ पुरस्कारदेखील प्राप्त झाला. 2001 साली भारतीय विज्ञान अकादमीनं त्यांची फेलो म्हणून निवड केली. भटनागर पारितोषिक पन्नाशीच्या आतील शास्त्रज्ञांनाच देण्यात येते. डॉ. बेग यांना हे पारितोषिक पृथ्वी, वातावरण, महासागर आणि ग्रहीय विज्ञानातील योगदानासाठी देण्यात आलं.

डॉ. गुफरान बेग यांनी वातावरणीय रसायनशास्त्राची प्रादेशिक हवामानातील निश्चित भूमिका शोधण्याच्या कामी महत्त्वाचं संशोधन केलं. रासायनिक हवामानविषयक त्यांचं काम पुढे दिल्लीसाठी सर्वप्रथम हवा गुणवत्ताविषयक अंदाजप्रणाली विकसित करण्यासाठी महत्त्वाचं ठरलं. नैसर्गिकरित्या हवामानात घडणारे बदल आणि मानवी क्रियाकलापांमुळे घडून येणारे बदल याविषयीचे मूलभूत संशोधन करून डॉ. बेग आणि नेमक्या मानवी हस्तक्षेपामुळे होणारे हवामानविषयक बदल त्यांनी शोधण्याबाबत संशोधन केले. त्यांनी त्रिमितीय रसायनशास्त्र हवामान बदल प्रारूप तयार करून वातावरणीय रसायनशास्त्राचा प्रादेशिक हवामान बदलाबाबत संशोधन केलं. याबाबत त्यांनी देशातील विविध प्रदूषकांचं दशकागणिक वाढत्या प्रमाणाविषयी इन्व्हेट्री तयार केली.

विविध टेक्निकल पुस्तकांचं लेखन संपादनही केलंय. जवळपास 130 शोधनिबंध त्यांनी प्रकाशित केलेत. ‘एन्हिस’ या पर्यावरणविषयक आकडेवारी आणि माहिती उपलब्ध करून देणाऱया पोर्टलच्या कार्यदलात त्याचा समावेश समावेश आहे. ते पीएचडी पदवीसाठीचे मार्गदर्शकही असून त्यांनी 10 पेक्षा जास्त पीएचडीधारकांचे सुपरवायझर म्हणून काम केलंय, तर 10 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे ते मार्गदर्शकही आहेत. संशोधक विद्यार्थ्यांना संशोधनातील अडचणी दूर करण्याबरोबरच विविध कार्यक्रमांचं आयोजन करून विद्यार्थ्यांना संशोधन प्रवण करण्यामदयेही डॉ. बेग यांना प्रचंड रस आहे. तरुण विद्यार्थ्यांनी विषयात रस घेऊन संशोधानाकडे एक उत्तम कार्य करण्याची संधी यादृष्टीने बघायला हवे, असे ते नेहमी म्हणतात.

विविध आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शोधनियतकालिकांचे रेफ्री म्हणून काम करणारे डॉ. गुफरान उल्लाह बेग मुस्लिम असणं शास्त्रज्ञ बनण्यात अडथळा नसल्याचं आवर्जून सांगतात. संधी आहे, पण परिश्रम मात्र हवेच असे ते खांद्यावर थाप मारत हसत हसत सांगताना मला विज्ञान हे कुठल्याही धर्मबंधनात अडकलेलं नसल्याचं जाणवत राहतं.

[email protected]