पडद्याआडून – काळाच्या ओघात टिकून राहिलेली ‘जर तरची गोष्ट’,  संभ्रमातून समजुतीकडे नेणारा प्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>पराग खोत<<

मराठी रंगभूमीवर सध्या नातेसंबंधांच्या नव्या व्याख्या मांडणारी नाटपं येत आहेत. ब्रेकअप, घटस्फोट, ‘स्पेस’, ‘कमिटमेंट’ अशा शब्दांभोवती फिरणाऱ्या आजच्या पिढीच्या भावविश्वाला स्पर्श करणारे विषय रंगमंचावर येऊ लागलेत आणि त्याला तरुण प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसादही मिळतो आहे. अशाच पार्श्वभूमीवर जवळपास तीन वर्षांपूर्वी आलेलं आणि अजूनही सातत्याने मंचित होणारं ‘जर तरची गोष्ट’ हे नाटक म्हणूनच वैशिष्टय़पूर्ण आहे.

प्रिया बापट आणि उमेश कामत ही खऱ्या आयुष्यातली जोडी नाटक, वेबसीरिज आणि चित्रपट ह्या बहुविध माध्यमांतून आपल्यासमोर आलीय आणि त्यांच्यातल्या अफलातून केमिस्ट्रीमुळे त्यांनी रसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘नवा गडी नवं राज्य’नंतर या जोडीची रंगभूमीवर झालेली पुनरागमनाची ही नोंद महत्त्वाची. मात्र हे नाटक केवळ ह्या स्टारकास्टवर उभं राहात नाही; त्यामागे आहे लेखिका इरावती कर्णिक यांची समकालीन जाण. आजच्या पिढीच्या नात्यांमध्ये असलेली द्विधा मनःस्थिती, लग्न करायचं का? केल्यावर टिकवायचं कसं? नात्यात स्वतःला हरवायचं की स्वतःलाच जपायचं? या सगळ्या ‘जर’ आणि ‘तर’च्या कात्रीत अडकलेल्या मनःस्थितीचा सूक्ष्म वेध या नाटकात घेतला आहे.

राधा आणि समर ही मध्यवर्ती पात्रं प्रेमात पडतात, लग्न करतात आणि काही कारणांनी वेगळेही होतात. पण नातं तुटलं म्हणजे भावना तुटतातच असं नसतं, ही जाणीव नाटक अत्यंत हळुवारपणे करून देतं. घटस्पह्टानंतरही सवयी, आठवणी, आपलेपणाची ओढ टिकून राहते. ही भावनिक गुंतागुंत नाटकाचा गाभा आहे. “आपला काळच प्रॉब्लेमॅटिक आहे’’ ही ओळ आजच्या पिढीचं अचूक चित्र उभं करते. जुन्या पिढीचे नियम मान्य नाहीत, पण नवे नियम तयार करण्याची तयारीही नाही त्यामुळे ‘जर’ आणि ‘तर’च्या मध्ये अडकलेलं आयुष्य!

प्रिया बापटची राधा स्वतःचे निर्णय स्वतः घेणारी, करिअर आणि नातं यांचा समतोल साधू पाहणारी तरुणी आहे. तिच्या अभिनयात सहजता आणि भावनिक प्रामाणिकपणा आहे. उमेश कामतचा समर प्रेमळ, किंचित गोंधळलेला, पण मनाने प्रामाणिक वाटतो. दोघांमधील केमिस्ट्री ही नाटकाची जमेची बाजू ठरते. आशुतोष गोखले (अबिर) आणि पल्लवी अजय (सती) यांनी साकारलेली पात्रं नात्यांकडे वेगळ्या नजरेने पाहणाऱ्या व्यक्तींचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे रंगमंचावर उभं राहिलेलं विश्व केवळ दोन व्यक्तींचं राहात नाही; ते आपल्यापैकी प्रत्येकाचं होतं.

प्रिया बापट (राधा) आणि उमेश कामत (समर) ही जोडी एक जोडपं म्हणून अनेक जोडप्यांची गमतीशीर गोष्ट तर सांगतातच, शिवाय आपल्या सहज अभिनयातून प्रेमळ नात्याकडून असलेल्या अपेक्षादेखील समर्थपणे मांडतात. स्वतःचा निर्णय स्वतः घेणारी आणि रिलेशनशीप सांभाळून करिअरवर पह्कस करणाऱ्या सतीच्या भूमिकेत पल्लवी अजय विशेष लक्ष वेधून घेते. आशुतोष गोखले यांचा इनोसंट अबिर बाजी मारून जातो. नाटकातील गंमतीची गोष्ट प्रेक्षकांपुढे सहजपणे मांडण्यात लेखिका इरावती कर्णिक प्रचंड यशस्वी झाल्या आहेत. नाटकातील ‘जर तर’ची हीच गोष्ट अधिक खुलवण्यासाठी अद्वैत दादरकर / रणजीत पाटील या दिग्दर्शकद्वयींनी आपले दिग्दर्शन कौशल्य पणाला लावत ही कलाकृती प्रभावी केली आहे. संदेश बेंद्रे यांचे नेपथ्य आणि अमोघ फडके यांची प्रकाशयोजना नाटकाच्या गोष्टीला साजेशी आहेत. श्रीनाथ म्हात्रे यांच्या संगीताने गोष्टीत गहिरे रंग भरले आहेत. जर तर च्या या नात्याला वन्स मोअर देण्यात हे नाटपं यशस्वी झालं आहे.

दिग्दर्शकद्वयीने नात्यांमधील सूक्ष्म छटा अचूक पकडल्या आहेत. प्रसंगांमधील विनोद आणि वेदना यांचा समतोल राखताना त्यांनी नाटकाला प्रवाही ठेवले आहे. संदेश बेंद्रे यांचे नेपथ्य आणि अमोघ फडके यांची प्रकाशयोजना कथेला पूरक ठरते, तर श्रीनाथ म्हात्रे यांचे संगीत, विशेषतः ‘जर-तर’चे गाणे प्रेक्षकांच्या मनात रेंगाळते.

‘जर तरची गोष्ट’ हे केवळ प्रेमकथेचे नाटक नाही; ते आजच्या पिढीच्या मानसिकतेचं स्पंदन आहे. नातं टिकवायचं की सोडायचं, हा प्रश्न काळाचा नसून दोन माणसांच्या गरजेचा असतो, हा साधा पण महत्त्वाचा संदेश नाटक देतं. तरुणांसोबतच आई-वडील, आजी-आजोबा यांनाही विचार करायला लावणारं हे नाटक म्हणजे पिढय़ांमधील संवादाची एक अर्थपूर्ण संधी आहे. ‘जर’ आणि ‘तर’च्या संभ्रमातून बाहेर पडून ‘आपलं’ काय, हे शोधण्याचा प्रवास अनुभवायचा असेल, तर ही गोष्ट रंगमंचावर पाहायलाच हवी.

nलेखन इरावती कर्णिक

nदिग्दर्शन अद्वैत दादरकर, रणजित पाटील

nकलाकार प्रिया बापट, उमेश कामत, पल्लवी अजय, आशुतोष गोखले

nनेपथ्य संदेश बेंद्रे

nप्रकाश अमोघ फडके

nसंगीत श्रीनाथ म्हात्रे

nनिर्माते नंदू कदम