वसुंधरेचा श्वास

>> जयेश राणे

वसुधैव कुटुम्बकम् असं आपली संस्कृती सांगते. कोण कोण येतं या पृथ्वीव्यापी कुटुंबात? या पृथ्वीवरचे माणसांसहित सारे सजीव. त्यामुळे या सगळय़ा ‘कुटुंबियांचं’ रक्षण करण्याची जबाबदारी मुख्यत्वे बुद्धिमान माणसावर येते. हे रक्षण करताना अर्थातच पृथ्वीवरची सर्व नैसर्गिक संसाधनं अबाधित ठेवायला हवीत. त्यांचा अनिर्बंध विनाश न होता पृथ्वीच्या प्रकृतीला मानवेल अशा बेताने विकासाची पावलं पडायला हवीत. अन्यथा अति हव्यासाच्या नादात आत्मनाशाकडे जाण्याची वेळ येईल, याची जाणीव गेल्या काही दशकांत आपल्या ‘प्रगत’ जगाला झाली. मग ‘वसुंधरा परिषद’ नावाची कल्पना अस्तित्वात आली. नैसर्गिक उत्पातावर आपला ताबा असला, म्हणजे सुनामी, भूकंप, चक्रीवादळं अशनीपात वगैरे गोष्टी त्वरित रोखता येणं शक्य नसले तरी गेल्या शतक, दीड शतकात मानवनिर्मित प्रदूषणामुळे विस्कटत चाललेलं वातावरण पुन्हा त्याच्या नैसर्गिक स्वरूपाकडे कसं न्यायचं याचा विचार सुरू झाला.

जागतिक वसुंधरा दिवस किंवा सप्ताह पाळला जाऊ लागला तो यासाठीच. आताही 20 ते 22 एप्रिल या काळात याविषयी जागतिक पातळीवर जनजागृतीचं आवाहन केलं जातंय. सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या आपल्या पृथ्वीचं आरोग्य टिकावं म्हणून क्षीण का होईना, पण प्रयत्न सुरू झालेत हेसुद्धा महत्त्वाचे आहे.

पृथ्वीला संस्कृतमध्ये जवळजवळ सत्तावीस नावं आहेत. भू, भूमी, अचला, अनंता, धरा, धरित्री, अवनी, धरणी, वसुधा, वसुमती, क्षमा, मेदिनी… आणि आणखी अनेक नावांनी पृथ्वीचा उल्लेख होतो. यातलंच एक नाव आहे विपुला. पृथ्वीवर राहणाऱया सजीवांना या जलसंपन्न, वायूसंपन्न, वनसंपन्न ग्रहाने आजवर खरोखरच विपुल प्रमाणात ‘जीवन’ दिलं आहे. पृथ्वीवर जीवसृष्टी कशी निर्माण झाली याविषयी अनेक गृहितकं (हायपोथिसिस) आहेत. सागराच्या पाण्यात जीव निर्माण झाले की छोटय़ा छोटय़ा तळय़ांमध्ये सजीव प्रथम जन्मले यावर मत-मतांतर आहेतच, पण या अभ्यासाच्या वादातून केव्हा तरी तत्त्वबोध नक्की होईल आणि पृथ्वीवर सजीव निश्चितपणे समजेल.

पण पृथ्वी स्वतःच एखाद्या ‘सजीवा’सारखी आहे असं कुणी म्हटलं तर? पृथ्वीचं हे ‘सजीवत्व’च या ग्रहाचं आत्मरक्षण करीत असतं. तसं ‘आत्मभान’ या निळय़ा पाणीदार ग्रहाला आहे. या लेखात ‘ब्लू मार्बल’ हा अपोलो-17 यानाने घेतलेला संपूर्ण पृथ्वीचा फोटो पृथ्वी अवकाशातून किती सुंदर दिसते ते स्पष्ट करतो.

तर पृथ्वीच्या ‘सजीव’पणाची कल्पना म्हणजे ‘गैया’ किंवा ‘गाइया’ गृहितक अथवा हायपोथिसिस. 1970 च्या दशकात जेम्स लव्हलॉक या भूशास्त्रज्ञाने तशी मांडणी केली. पृथ्वीवरचे सूक्ष्म सजीव भोवतालच्या असेंद्रिय वातावरणाशी सहयोग करून आपली स्वनियंत्रित पद्धत विकसित करतात असं त्याचं साधारण स्वरूप आहे. म्हणजे पृथ्वी स्वतःचं अस्तित्व सांभाळते का? 2006 मध्ये लव्हलॉक यांनी लंडनच्या जिऑलॉजिक सोसायटीचं पदकही यासंदर्भात प्राप्त केलं. समुद्रांचा खारटपणा, वातावरणातील ऑक्सिजनचं (प्राणवायू) प्रमाण समतोल राहातं, असा विचार लव्हलॉक यांनी जेव्हा मांडला तेव्हा त्यावर भरपूर टीकाही झाली.

मात्र पृथ्वीच्या या सजगतेची कल्पना फार पूर्वीपासून अनेकांच्या मनात होती. संशोधक स्टीफन हार्डिंग यांनी ‘ऑनिमेटअर्थ’ (सजीव पृथ्वी) असं लिखाणही केलं. लव्हलॉक यांचे विचारनिबंध अनेक वैज्ञानिक मासिकांत प्रसिद्ध झाले. नंतर लिन मार्गालिस या सूक्ष्मजीवतज्ञ त्यांच्याबरोबर संशोधन करू लागल्या. मात्र लिन यांच्या मते ‘पृथ्वीच एक ‘सजीव’ असं म्हणण्यापेक्षा सूक्ष्मजीवांच्या परस्पर संबंधातून एक रचना (सिस्टीम) आहे,’ असं म्हणतात.

या गृहितकाला सिद्धांताचं स्वरूप आलेलं नसलं तरी त्यावर भरपूर चर्चा मात्र होत असते. पृथ्वीच्या जन्मापासून निसर्गतः अनेक बदल झालेत. सुरुवातीला ‘कार्बन बेस्ड’ (कर्बद्धिप्राणिलवायुवर आधारित) असलेले जीव कालांतराने नष्ट होऊन माणसासह प्राणवायुवर (ऑक्सिजन) जगणारे जीव निर्माण झाले. डायनॉसॉरसारख्या महाकाय सजीवांचा अशनीपाताने अंत झाला. पृथ्वीने सोलार अब्ज वर्षांत अशा अनेक जैविक क्रांती-उक्रांती पाहिल्या आहेत. या सर्व सूक्ष्म ते महाकाय सजीवांमुळे आणि अद्वितीय वातावरणामुळे या ग्रहावर जीवसृष्टी बहरली आहे. माणसाने ते नैसर्गिक स्वरूप, कृत्रिम प्रदूषणाने ग्रासून पृथ्वीचा श्वास कोंडू नये याची दक्षता घ्यायला हवी… कारण पृथ्वी टिकली तरच आपलं अस्तित्व राहणार याची जाण असो द्यावी! अन्यथा पृथ्वीने स्वतःचा विचार केला तर माणसाचे काय? बिचारी! माणसाने स्वतःसह पृथ्वीरक्षणाचे भान ठेवायलाच हवे.

आपली प्रतिक्रिया द्या