आला, वेरेतनन धूमकेतू आला!

186

>> श्रीनिवास औंधकर

सध्या पृथ्वीच्या जवळ एक धूमकेतू येऊ घातलेला आहे. हा धूमकेतू आकाराने अतिशय लहान, परंतु दर सहा वर्षांनी तो वेळोवेळी दिसत राहणार आहे. संपूर्ण डिसेंबर महिन्यात हा धूमकेतू काही दिवस साध्या डोळ्यांनी, तर काही दिवस दुर्बिणीने पाहायला मिळणार आहे. जसजसा तो सूर्याच्या जवळ जाईल, त्याचा कोमा अधिकाधिक तेजस्वी होत जाऊन तो अधिक प्रकाशमान होणार आहे. वेरेतनन धूमकेतू असे त्याचे नाव आहे. हा धूमकेतू सूर्य आणि गुरू ग्रहामध्ये परिभ्रमण करणारा असून सध्या तो सूर्याच्या दिशेने जात आहे.

सूर्यमालेत एक तारा म्हणजे आपला सूर्य, आठ मूळ ग्रह, या ग्रहांचे एक किंवा अनेक चंद्र, लघुग्रहांचा पट्टा आणि धूमकेतू यांचा समावेश असतो. यापैकी धूमकेतूची आपल्याला फारच कमी माहिती असते. धूमकेतू म्हणजे सौरमालेच्या आत किंवा सौरमालेच्या बाहेरून आपल्या सूर्याभोवती फेरी मारून जाणारा धूळ, बर्फ आणि खनिजांचा ग्रहताऱ्यांच्या किंवा उपग्रहांच्या तुलनेत अतिशय छोटासा एकीकृत घटक होय. काही धूमकेतू हे सूर्य आणि गुरू या दोन ग्रहांमध्ये सूर्याभोवती फेरी मारणारे धूमकेतू (आवर्ती) तर काही धूमकेतू सौरमालेच्या बाहेर खूप दूरपर्यंत जाऊन पुन्हा सूर्याभोवती फेरी मारायला येतात; परंतु एकूणच धूमकेतूंचा आकारच एवढा लहान असतो की, सौरमालेच्या बाहेर जाणारे धूमकेतू पुन्हा दुसऱ्या चकरेला परत येण्याऐवजी अवकाशात नष्ट होऊन जातात. अशा धूमकेतूंना अनावर्ती धूमकेतू म्हटले जाते.

तसे वर्षभरात साधारण डझनभर धूमकेतू आकाशात येऊन जातात, परंतु अलीकडे लक्षात राहील असा एकही धूमकेतू आकाशात पाहायला मिळालेला नाही. मात्र नुकताच एक धूमकेतू सध्या रात्रीच्या आकाशात दिसतो आहे. खगोल अभ्यासकांना व खगोलप्रेमींना ही एक संधीच उपलब्ध झालेली आहे. वेरेतनन धूमकेतू असे त्याचे नाव आहे. आवर्ती श्रेणीतील असल्याने त्याचा ४६ पी असा क्रमांक आहे. हा धूमकेतू सूर्य आणि गुरू ग्रहामध्ये परिभ्रमण करणारा असून सध्या तो सूर्याच्या दिशेने जात आहे. साधारणत: १६ डिसेंबर २०१८ रोजी वेरेतनन धूमकेतू पृथ्वीच्या सर्वात जवळ म्हणजे १ कोटी १५ लाख ८६,३५० किमी अंतरावरून सूर्याच्या दिशेने जाणार आहे. त्यामुळे सध्या म्हणजे डिसेंबर महिन्यात तो आपल्याला शहराबाहेर रात्रीच्या काळोखात आकाशात द्विनेत्री, दूरदर्शक किंवा साध्या डोळ्यांनी पाहता येणार आहे.

कार्ल अलवर वेरेतनन यांनी लावला शोध
या धूमकेतूचा शोध कार्ल अल्वर वेरेतनन यांनी १५ जानेवारी १९४८ रोजी अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या लीक वेधशाळेतील दुर्बिणीद्वारे लावला. ४६पी / वेरेतनन पीरियॉडिक धूमकेतू हा गुरू ग्रह कुलातील धूमकेतू असून तो दर ६.७ वर्षांत सूर्याला चक्कर मारतो, परंतु एप्रिल १९७२ व फेब्रुवारी १९८४ या वर्षी ४६पी / वेरेतनन पीरियॉडिक धूमकेतू गुरू ग्रहाच्या खूप जवळ गेला व परत तिथून निसटल्यावर त्याच्या कक्षेवर गुरूच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम दिसून आला. त्याच्या कक्षा परिभ्रमणाचा कालावधी ६.७ व ५.५ वर्षे असा दिसून आलेला आहे. प्राथमिक माहितीनुसार त्याचा आकार एक ते सवा किलोमीटर एवढा आहे.

धूमकेतू : नाभी, कोमा आणि शेपूट
कोणत्याही धूमकेतूचे तीन भाग असतात. नाभी, कोमा आणि शेपूट. नाभी म्हणजे धूमकेतूचे मूळ घटक, जे बर्फाचे किंवा घन पदार्थांचे असतात. त्याभोवती वायू आणि धुळीचे जे आवरण असते त्याला कोमा म्हणतात आणि याच धूळ, वायूंपासून त्याची लांब शेपटी तयार होत असते. सध्या वेरेतनन धूमकेतूचे केंद्र तेजस्वी, शुभ्र निळसर रंगाचे दिसत आहे. कोमा मात्र जास्त प्रकाशमान झालेला नाही. डिसेंबरच्या सुरुवातीच्या दहा दिवसांत आकाशात चंद्र जास्त प्रकाशित नसल्याने हा धूमकेतू पाहायला मिळणार आहे. मात्र १६ डिसेंबर रोजी पृथ्वीच्या सर्वात जवळून जात आहे व यादरम्यान रात्रीच्या आकाशात चंद्र जास्त प्रकाशमान असल्याने धूमकेतू साध्या डोळ्यांनी पाहायला अवघड जाणार आहे. या धूमकेतूची दृष्यमान प्रत ही +३ पर्यंत असणार असल्याने शहराबाहेरच्या रात्रीच्या आकाशात नुसत्या डोळ्यांनी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

१६ डिसेंबर २०१८ रोजी हिंदुस्थानी वेळेनुसार सायंकाळी ६:३६ वाजता या ४६पी / वेरेतनन या पीरियॉडिक धूमकेतूचे पृथ्वीपासूनचे अंतर केवळ १ कोटी १५ लाख ८६,३५० किमी इतके कमी असणार असल्यामुळे या धूमकेतूने मानवाच्या ज्ञात असलेल्या काळातील सर्वात जवळ असलेल्या वीस धूमकेतूंच्या यादीमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. त्यानंतर लगेच चार दिवसांनी ४६पी / वेरेतनन धूमकेतू सूर्यापासून १८ कोटी ७० लाख किमी अंतरावर असणार आहे व येथून तो आपला परतीचा प्रवास सुरू करणार आहे. तो जसजसा सूर्याजवळ जाऊ लागेल तसतशी त्याच्यातील बर्फाची वाफ होऊन कोमा अधिकाधिक तेजस्वी होत जाईल आणि त्यामुळे त्याची शेपटी वाढत जाईल. चालू शतकात पृथ्वीजवळ येणाऱ्या अनेक धूमकेतूंपैकी हा धूमकेतू सर्वात तेजस्वी धूमकेतू ठरणार आहे. त्यामुळे त्याला महत्त्व आहे.

महाराष्ट्रातील विज्ञान प्रेमींमध्ये उत्साह
या धूमकेतूची माहिती मिळाल्यानंतर त्याचे निरीक्षण करण्यासाठी महाराष्ट्रातील विज्ञान प्रेमींमध्ये एक प्रकारचा उत्साह संचारला आहे. महाराष्ट्रातील विविध शहरांमधील विज्ञान प्रेमी, खगोल प्रेमी धूमकेतूच्या निरीक्षणाचे कार्यक्रम राबवू शकतात. संभाजीनगर येथील एमजीएमच्या एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्रातर्फे १३ डिसेंबर २०१८ रोजी (बुधवार) रात्री खास आकाश दर्शनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या आकाश दर्शनाच्या वेळी ४६पी / वेरेतनन हा धूमकेतू पाहायला मिळणार आहे.

आकाशात कुठे व कसा दिसेल…
४६पी / वेरेतनन हा धूमकेतू आकाशात नेमका कुठे आहे पहाण्यासाठी सोबतच्या आकाशाच्या नकाशाची चांगली माहिती असावी लागणार आहे. या नकाशात वेरेतनन हा पीरियॉडिक धूमकेतू संपूर्ण डिसेंबर २०१८ या महिन्यात कसकसा मार्गक्रमण करणार आहे हे दाखवले आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला एरिडुनस (भरणी नक्षत्राच्या दक्षिणेस) हा धूमकेतू दिसणार असून दिनांक १०–१३ दरम्यान भरणीच्या पूर्वेस पाहता येईल, जेव्हा हा धूमकेतू पृथ्वीजवळ असेल (दिनांक १६ डिसेंबर). या दिवशी तो कृत्तिका नक्षत्राच्या अतिशय जवळ दिसणार आहे. तसाच तो पुढे सरकत सारथी तारकासमूहातील ब्रह्महृदय या ताऱ्याजवळ असेल. म्हणजे या धूमकेतूचा डिसेंबर महिन्यातील प्रवास हा दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्ध असा असणार आहे. त्यामुळे हिंदुस्थानातील नागरिकांसाठी या धूमकेतूच्या निरीक्षणाची चांगली संधी असणार आहे.

(लेखक एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक आहेत.)
[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या