अंतराळातील बलिदान

khagoldilip@gmail.com

ज्या चॅलेंजर यानातून अमेरिकेची पहिली अंतराळयात्री सॅली राइड अंतराळात जाऊन आली ते अमेरिकेचे स्पेस शटल १९८६ मध्ये अपघातग्रस्त झाले आणि त्यात अमेरिकेची दुसरी आणि जगातली चौथी महिला अंतराळयात्री ज्युडिथ रेस्निक हिचा वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी मृत्यू झाला. अंतराळवीर होणे हे अपार कष्टाचे आणि रोमांचकारी आहे तसेच ते साहसाचेही आहे. पृथ्वीवरून दूर अंतराळात एखादी छोटीशी गफलत झाली तरी अंतराळयान कोसळू शकते. अनेक यशस्वी उड्डाणे केलेल्या ‘चॅलेंजर स्पेस शटल’चाही अंत एका अपघातात झाला. मानवी संशोधनाच्या, वैज्ञानिक प्रगतीसाठी उमेदीच्या, तरुण अंतराळवीरांनी दिलेले हे बलिदान होते.

ज्युडिथ रेस्निक यांचा जन्म अमेरिकेतील ओहायो राज्यात १९४९ मध्ये झाला. अंतराळात जाणाऱ्या त्या पहिल्या ज्युइश – अमेरिकन व्यक्ती होत्या. त्यांचे मातापिता युक्रेनमधून अमेरिकेत आले होते. विज्ञानाची आवड असलेल्या ज्युडिथ यांनी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी घेतली. याच विषयात त्यांनी मेरीलॅन्ड विद्यापीठातून डॉक्टरेट (पीएच.डी.) प्राप्त केली. त्यानंतर त्या एका कंपनीत डिझाइन इंजिनीअर म्हणून काम करू लागल्या. या कंपनीला (आरसीए) ‘नासा’वरून अनेक कॉन्ट्रक्टस् मिळत असत. १९७८ मध्ये ऍस्ट्रॉनॉट तयार करण्याच्या योजनेत ज्युडिथ यांची निवड झाली. विशेष म्हणजे ‘नासा’साठी स्वयंसेवी काम करणारी अभिनेत्री निशेल निकोलस हिच्या शिफारशीवरून ज्युडिथला ‘नासा’च्या प्रकल्पात प्रवेश मिळाला.

प्रशिक्षणानंतर ज्युडिथ यांची निवड डिस्कव्हरी यानातून अंतराळात जाण्यासाठी झाली. मिशन स्पेशॅलिस्ट म्हणून त्या यात सहभागी झाल्या होत्या. त्याचप्रमाणे ‘चॅलेंजर’ यानातही त्यांच्याकडे अशीच कामगिरी होती. चॅलेंजरला झालेल्या अपघातानंतर त्याचे ‘कॉकपिट’ सापडल्यावर त्यातील संग्रहित माहिती समजली. त्यातून पायलट स्मिथ यांचे कॉकपिट यानापासून विलग झाल्यानंतर ज्युडिथ व त्यांचे सहकारी किंचित काळ जीवित असावेत असे मत व्यक्त केले गेले. अर्थात त्या अपघातात सर्व सहा अंतराळयात्रींचा अंत झाला होता.

ज्युडिथ रेस्निक यांना अनेक मरणोत्तर सन्मान लाभले. अमेरिकेत अनेक ठिकाणी त्यांच्या स्मरणार्थ इमारतींना त्यांचे नाव देण्यात आलेच, पण चंद्रावरच्या एका विवरालाही ‘रेस्निक विवर’ असे नाव मिळाले. मेरीलॅन्ड विद्यापीठाने इंजिनीअरिंगच्या लेक्चर हॉलला रेस्निक यांचे नाव देऊन आपल्या पराक्रमी भूतपूर्व विद्यार्थिनीचा सन्मान केला. महिला इंजिनीअर्सच्या संस्थेने रेस्निक चॅलेंजर पदक, कर्तृत्ववान महिला इंजिनीअरनी स्पेस इंजिनीअरिंग क्षेत्रात केलेल्या कामासाठी सुरू केले.

ज्युडिथ रेस्निक यांना मरणोत्तर सन्मान प्राप्त झाले आणि त्यांचे नाव जागतिक ‘स्पेस प्रोग्रॅम’मध्ये कायमचे नोंदले गेले हे खरे असले तरी त्यांच्यासारख्या एका संशोधिकेचा अकाली मृत्यू, कल्पना चावलाच्या दुर्दैवी अंतासारखाच चटका लावणारा होता.