‘महिला सन्मान’ गेला कुठे?

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत जे पाहायला मिळत आहे ते मन सुन्न करणारे आहे. महिला सन्मानाच्या गप्पा तर सगळेच राजकीय पक्ष मारतात. मात्र पश्चिम बंगालमधील दोन राजकीय हल्ल्यांनी महिलांचा सन्मान बंगालमध्ये राखला गेला आहे काय, असा सवाल उपस्थित केला आहे.

एका घटनेत हावडाच्या दक्षिण उलबेरिया मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार पापिया अधिकारी यांच्यावर विरोधी पक्षाच्या पुरुष कार्यकर्त्याने चक्क थप्पड मारून हल्ला केला, तर दुसऱया घटनेत आरामबागमधील तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार सुजाता मोंडल खान यांच्यावर भाजपच्या पुरुष कार्यकर्त्यांनी हल्ला केला. दुर्दैव म्हणजे भाजप व तृणमूलच्या राजकीय लठ्ठालठ्ठीमध्ये तृणमूलमधून भाजपात आलेले खासदार सौमित्र खान व त्यांच्या पत्नी सुजाता मोंडल खान यांचा सोन्यासारखा संसार मात्र मोडला. दोघे दोन पक्षांत, त्यामुळे त्यांचा घटस्पह्ट झाला. निवडणुका येतात जातात, कोणी जिंकते कोणी हरते तो लोकशाही प्रकियेचा एक भाग झाला. मात्र, ज्या बंगालने महाराष्ट्राच्या बरोबरीने देशाला दिशा देण्याचे काम केले, स्वातंत्र्यपूर्व आंदोलनात ज्या बंगालचे अमूल्य योगदान राहिले, जन गण मन आणि वंदे मातरम् यांचे सूर ज्या भूमीत जन्माला आले तिथेच महिलांवर हल्ले होत असतील तर हे कोणत्या सुदृढ लोकशाहीचे लक्षण समजायचे?

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल यथावकाश लागतीलच. मात्र, बंगालमध्ये या निवडणुकीदरम्यान जे घडले ते कोणत्याही लोकशाहीप्रधान देशासाठी निश्चित भूषणावह नाही. भाजप आणि तृणमूल काँग्रेसने जी राजकीय संस्कृती बंगालमध्ये जन्माला घातली ती घातक आहे.

आपली प्रतिक्रिया द्या