कोकणचा ज्ञानकोश

976

>> आशुतोष बापट

कोकणच्या मातीचा गुणच काही और आहे. अनेक नररत्ने या मातीने आपल्या देशाला दिलेली आहेत. अण्णा शिरगावकर हे असेच एक कोकणचे सुपुत्र. कोकणच्या इतिहास संशोधनाचा ध्यास या माणसाने घेतला. या प्रवासात त्यांना अनेक माणसे, वस्तू आणि अनुभव मिळाले. या  संचिताच्या भांडवलावर वयाच्या 90 व्या वर्षीदेखील त्यांच्यातला संशोधक जागा आहे.

वसिष्ठी नदीच्या काठावर असलेल्या विसापूर गावी सन 1930 ला वैश्यवाणी कुटुंबात अण्णांचा जन्म झाला. जेमतेम सातवीपर्यंतचे शिक्षण झाल्यावर हा अवलिया जगाच्या विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी बाहेर पडला. ‘ग्रंथ हेच आपले गुरू’ हे लोकमान्य टिळकांचे वाक्य अण्णांच्या मनावर कोरले गेले. त्यामुळे वाचनाचा सपाटा सुरू झाला. वाचन, घरचे दुकान हे सगळे सांभाळून समाजकार्यासाठी अण्णांनी स्वतःला झोकून दिले. जनसंघाचे काम तळागाळात रुजवले. बैठका, सत्याग्रह, मुक्ती लढा, आणीबाणीतील अटक या सगळ्या गोष्टींमध्ये अण्णांना, पत्नी नंदिनी काकूंचे मोठे पाठबळ लाभले. त्यावेळचे राजकारण आजच्यासारखे नव्हते. सर्व विचारधारांची मंडळी एकमेकांशी उत्तम संबंध जोडून होती. अण्णांना प्रत्येकाकडून काहीना काही शिकायला मिळाले. पण अण्णांचा मूळ पिंड समाजकार्याचा. दाभोळ इथे 1983 साली सागरपुत्र संस्थेची स्थापना केली. याद्वारे सहकारी सोसायटय़ा, अपंग पुनर्वसन संस्था, गरीब-दलित मुला-मुलींसाठी वसतिगृहे, वाचनालये असे अनेक उपक्रम हाती घेतले. सागरपुत्र संस्थेचा लौकिक सर्वदूर पसरला. अनेक विद्वान, लेखक, साहित्यिक, राजकारणी यांनी संस्थेला भेटी देऊन आपापल्या परीने मदत केलेली आहे. हे सगळे सुरू असताना अण्णांच्यामध्ये असलेला इतिहासाचा अभ्यासक आणि संशोधक सदैव जागा होता. कोकणच्या इतिहासाचा अभ्यास व्हावा, तो जगापुढे यावा आणि त्याद्वारा आपल्या प्रांताची ओळख जगाला व्हावी या हेतूने अण्णांनी अनेक गावे पालथी घातली.

त्यातून त्यांना कोकणच्या इतिहासावर प्रकाश टाकणारे विविध ताम्रपट, अनेक नाणी आणि इतरही बऱयाच वस्तू सापडल्या. काही वस्तू तसेच ताम्रपट अण्णांनी वाडय़ावस्त्यांवर जाऊन ज्यांच्याकडे होते त्यांना त्याचे महत्त्व सांगून अभ्यासासाठी प्राप्त केले. यातून उभे राहिले एक अफाट वस्तुसंग्रहालय. प्रत्येक वस्तूच्या प्राप्तीमागे एकेक सुंदर कथा जोडलेली आहे. अण्णांना सगळ्या गोष्टी काही अगदी सहजगत्या मिळाल्यात असे नाही. त्यासाठी त्यांना सणवार, ऊन-पाऊस यांची तमा न बाळगता मैलोन्मैल पायपीट करावी लागलेली आहे. पण या पायपिटीचा अण्णांना कायम अभिमान वाटत आलेला आहे. अण्णांकडील नाण्यांचा संग्रह तर डोळे दिपवणारा आहे. आदिलशाही लारी, दोन हजार वर्षांपूर्वीचे पंचमार्क कॉईन, चालुक्यांची नाणी, गधीया नाणी, शिवराया अशा विविध नाण्यांचा संग्रह अण्णांनी केलेला आहे. तसेच विशाळगडावर मिळालेली चांदीची मोहोर, रायगडावर मिळालेली दगडी पणती, नाणी बनवण्याच्या मुशी आणि शिलालेख, ताडपत्रे, तलवारी, वीरगळ, घंटा, भांडी अशा विविध वस्तूंचे संकलन अण्णांनी केले. वयोमानाने यांचे संवर्धन आपल्याकडून होऊ शकणार नाही याची जाणीव झाल्यावर हे सगळे संकलन अण्णांनी ठाण्याच्या ओरिएंटल स्टडीज या संस्थेला प्रदर्शनार्थ देऊन टाकले आहे. या संग्रहासोबतच 1970 मध्ये दापोली तालुक्यातील पन्हाळेकाजी इथल्या लेणींचा शोध लावण्याचे मोठे कार्य अण्णांनी केले.

पुरातत्व विभागाचे तत्कालीन डायरेक्टर जनरल  एम. एन. देशपांडे यांनी याबद्दल अण्णांचे विशेष कौतुक केलेले आहे. देशपांडे यांनी त्यानंतर या लेण्यांवर विस्तृत काम केले आणि त्या लेण्यांना राष्ट्रीय वारसा म्हणून मान्यता मिळाली. अण्णा शिरगावकर म्हणजे एक झपाटलेले व्यक्तिमत्त्व होय. राजकारण, समाजकारण, अफाट लोकसंपर्क आणि इतिहासाची प्रचंड ओढ यामुळे अण्णा एक समृद्ध आयुष्य जगले. कुठल्याही पदाची, पुरस्काराची कधी लालसा ठेवली नाही. जिल्हा परिषदेचे सभापतीपद भूषविलेले अण्णा निव्वळ राजकारणात कधीच राहिले नाहीत. पक्षातीत लोकसंग्रहाचा उपयोग त्यांनी सागरपुत्र या संस्थेद्वारे तळागाळातील लोकांच्या सेवेसाठी केला. अण्णांना पुरस्कारसुद्धा बरेच मिळाले. दलितमित्र पुरस्कार, निर्भय नागरिक पुरस्कार, गुहागर गौरव पुरस्कार, कोकण दर्पण पुरस्कार अशा पुरस्कारांसोबत अनेक संस्थांनी त्यांना गौरविलेले आहे. पण आजही अण्णा शिरगावकर म्हटले की, त्यांचे इतिहास संशोधनाचे कार्यच डोळ्यांपुढे येते. या विषयावर अण्णांनी पुस्तकेसुद्धा लिहिलेली आहेत. त्यांचे ‘शोध अपरांताचा’ आणि ‘गेट वे ऑफ दाभोळ’ ही पुस्तके खूप गाजली.

अण्णांच्या या अफाट आयुष्याला साथ देणारी त्यांची सहधर्मचारिणी 2012 साली त्यांना सोडून अनंताच्या प्रवासाला निघून गेली. त्यानंतर अण्णांनी दाभोळ सोडले आणि शिरगाव इथे त्यांच्या मुलीकडे स्थायिक झाले. नव्वदाव्या वर्षीही असलेली तीक्ष्ण स्मरणशक्ती आणि इतिहासावर तासन्तास गप्पा मारण्याची त्यांची क्षमता थक्क करणारी आहे. अण्णा शिरगावकर म्हणजे कोकणचा चालताबोलता ज्ञानकोश आहेत.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या